UP Election: `मुस्लीम भगिनींचा पाठिंबा पाहून मतांचे ठेकेदार अस्वस्थ`, मोदींचा विरोधकांवर निशाणा
मुस्लिम महिलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये आज पश्चिम यूपीच्या ५८ जागांसाठी मतदान होत आहे, तर दुसरीकडे पुढच्या टप्प्याचा प्रचारही जोरात सुरू आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहारनपूरमध्ये एका सभेला संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदींनी मुस्लिम महिलांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला.
पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा मुस्लिम बहिणी आणि मुलींचा पाठिंबा भाजपला उघडपणे मिळू लागला. तेव्हा मतांच्या ठेकेदारांची झोप उडाली. त्याच्या पोटात दुखू लागलं.
पीएम मोदी म्हणाले, "जेव्हा मुस्लिम महिलांचा उघडपणे भाजपला पाठिंबा मिळू लागला. त्यांनी भाजप सरकारचं कौतुक करण्यास सुरुवात केली. शतकांनंतर त्यांना इतका मोठा सन्मान मिळाल्याने त्या भाजपाचा गौरव करु लागल्या, हे पाहून मतांच्या ठेकेादारांची झोप उडाली, ते बैचेन झाले, आमची मुलगी मोदी मोदी करतेय, हे पाहून त्यांच्या पोटात दुखायला लागलं.
सहारनपूर इथल्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, "सबका साथ सबका विकास हा यूपीचा मूल मंत्र आहे. भाजपच्या विकासात मुलींचा सहभाग ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे, त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्र मुलींसाठी खुले केलं जात आहे. आम्ही मुस्लिम भगिनींना तिहेरी तलाकच्या अत्याचारातून मुक्त केले आहे. आम्ही तिहेरी तलाकविरोधातील कायद्याने मुस्लिम भगिनींना सुरक्षिततेची हमी दिली आहे." असं मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना पीएम मोदी म्हणाले , "मोदींच्या स्तुतीची मुस्लिम भगिनींची वक्तव्यं, त्यांचे व्हिडीओ पाहून या मतांच्या ठेकेदारांना वाटलं की, या मुलींना रोखावं लागेल. त्यामुळे मुस्लिम भगिनी आणि मुलींचे हक्क थांबवण्यासाठी, त्यांच्या विकासाच्या आकांक्षा रोखण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जात आहेत."
काही लोक मुस्लिम मुलींना फसवत आहेत, मुस्लिम मुली नेहमीच मागे रहाव्यात अशी त्यांची भूमिका आहे, पण आमचं सरकार प्रत्येक मुस्लिम आणि पीडित मुस्लिम महिलांच्या पाठीशी उभे आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.