UP Election 2022: भाजपचा मास्टरस्ट्रोक, योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मास्टरस्ट्रोक लगावला आहे
UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मास्टरस्ट्रोक लगावला आहे. राम मंदिर उभारणीच्या लाटेत भाजपच्या हिंदू राष्ट्रवादाला धार देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपसह मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी अयोध्येत योगींसाठी निवडणुकीची रणनिती आखायला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून निवडणूक लढवण्याबाबत सहमती देण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च नेतृत्वानेही योगींना अयोध्येतून लढण्यास मान्यता दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप अयोध्येत राम मंदिर, काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर आणि मथुरेत कृष्णजन्मभूमीवर मंदिर उभारणीचा मुद्दा प्रमुख बनवत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सत्ता हाती घेताच अयोध्येला सर्वोच्च प्राधान्य दिलं होतं. दरवर्षी दिवाळीत अयोध्येत दीपोत्सव आयोजित करून अयोध्येतील घाट, मंदिरांसह संपूर्ण अयोध्येच्या विकासावर योगींनी भर दिला आहे.
निवडणुकीत अयोध्या आणि हिंदू राष्ट्रवादाच्या नावावर ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपने योगींना अयोध्येतून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. पक्षाच्या रणनीतीकारांचा असा विश्वास आहे की सीएम योगी यांची अयोध्येतून उमेदवारी म्हणजे अवध आणि पूर्वांचलच्या जागांवरही भाजपला बळ देणारी असेल.
काशीतून मोदी, अयोध्येतून योगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशीचे खासदार आहेत. 2014 मध्ये मोदींनी काशीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला होता. काशी आणि अयोध्या ही बहुसंख्य हिंदू समाजाची श्रद्धा स्थानं आहेत. आता योगींना अयोध्येतून उमेदवारी देऊन भाजपला आपली बहुमताची व्होट बँक आणखी मजबूत करायची आहे.