`या` 2 मोठ्या शहरांमध्ये दारू आणि मांस विक्री बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
सरकारच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही शहरातील दारू आणि मांसाची दुकानं बंद केलीयेत.
मुंबई : यूपीच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला असून यामध्ये दोन शहरांमध्ये दारू आणि मांसवर बंदी घालण्याचा आदेश जारी केलाय. सरकारच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही शहरातील दारू आणि मांसाची दुकानं बंद केलीयेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ही दोन्ही अध्यात्मिक शहरं आहेत. त्यामुळे या ठिकाणी अशा उपक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
मथुरेत 37 दारू दुकानांना टाळं
योगी सरकारच्या आदेशानुसार, मथुरा महानगरपालिकेच्या 22 प्रभागांमध्ये मथुरेच्या श्री कृष्णाच्या जन्मस्थानाच्या आजूबाजूच्या 10 किमीच्या परिसरात दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यात आलीये. हा आदेश समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून 10 किलोमीटरच्या परिसरात येणाऱ्या 37 दुकानांवर दारू, बिअर आणि ड्रग्ज विक्री पूर्णपणे बंद केलीये.
राज्य सरकारनेही मथुरा महानगरपालिकेच्या 22 वॉर्डमध्ये येणारी सर्व 37 दुकानं बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी प्रभात चंद यांनी सांगितलं की, श्रीकृष्ण जन्मस्थानच्या 10 चौरस किलोमीटर परिसरात आता एकंही दारू आणि मांसचं दुकान सुरू नाही. बंद करण्यात आलेल्या दुकानांमध्ये बार परवानाधारक हॉटेल, दारू, बिअर अशा दुकानांचा समावेश आहे.