प्रयागराज : सरकारी भरती प्रक्रियेत हायटेक कॉपीच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. मात्र प्रथमचं अशा प्रकारची हायटेक कॉपी घडवून आणणारी एक टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीचे नाव सॉल्वर गॅंग आहे. तसेच या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत एक ब्रेझा कार, 15 ब्लूटूथ बर्ड, 6 सिम कार्ड, 6 ब्लूटूथ उपकरणे, 10 मोबाईल फोन, एक पॅन कार्ड आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेशमध्ये लेखपाल भरती परीक्षेत सॉल्व्हर गॅंग सक्रिय झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एसटीएफने भरती परीक्षेतील सॉल्व्हर गॅंगच्या सदस्यांना तपास करण्यास सुरुवात केली होती. वाराणसीच्या चेतगंज परिसरातून सॉल्व्हर गॅंगच्या सदस्यांनाही अटक करण्यात आली. याशिवाय बरेलीमधून देखील एकाला ताब्यात घेण्यात आले. राजधानी लखनऊ येथून सॉल्व्हर टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रयागराज येथून नरेंद्र कुमार पटेल आणि संदीप पटेल यांना अटक केली.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या सर्व सॉल्व्हर्सकडून ब्लूटूथ उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. 


अशी करायचे कॉपी
कानपूरमधील नवाबगंज येथून अटक करण्यात आलेल्या करण कुमारने कॉपी करण्याची संपूर्ण प्रक्रिया एसटीएफला सांगितली. चौकशीदरम्यान करणने एसटीएफला सांगितले की, त्याला ब्लूटूथ उपकरण देण्यात आले होते. हे उपकरण इतके लहान होते की ते कानात घातल्यानंतर दिसत नव्हते. डिव्हाइसचा माइक एटीएम कार्डाप्रमाणे चिपमध्ये एम्बेड केलेला होता. हे कार्ड गळ्याखाली बनियानमध्ये ठेवले होते. 


करणने पुढे सांगितले की, परीक्षा सुरू होताच तो प्रत्येक प्रश्न हळू हळू वाचत होता. केंद्राबाहेर एक सॉल्व्हर होता, जो प्रश्न ऐकून उत्तरे देत होता. हा सॉल्वर परीक्षा केंद्राबाहेर ब्रेझा गाडीवर बसून सर्वांना उत्तर सांगत होता. अशाप्रकारे सॉल्वर गॅग हायटेक कॉपी करत होती.  


कॉपीसाठी घेतले इतके पैसे 
प्रयागराजमध्ये लेखपाल भरती परीक्षेत कॉपी करण्य़ासाठी 7 उमेदवारांकडून  दहा लाख रुपये घेतले होते. आणि त्यांना हायटेक उपकरणे देत ही घटना घडवली जात होती. 


लेखपाल भरती परीक्षेत प्रयागराज येथून 6 जणांना अटक करण्यात आली. यूपी एसटीएफने वेगवेगळ्या ठिकाणांहून सर्वांना अटक केली. या टोळीने 7 उमेदवारांकडून दहा लाख रुपये घेतले होते. एसटीएफने पेपर सोडविण्यास मदत करणाऱ्यालाही पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फरार झाला. एसटीएफ त्याचा शोध घेत आहे.