लखनऊ: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (CAA) आंदोलनावेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्या दंगलखोरांविरोधात उत्तर प्रदेश सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासनाकडून अशा दंगलखोरांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा इशारा दिला होता. CAA विरोधातील आंदोलनावेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास ही रक्कम दंगलखोरांकडून वसूल केली जाईल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार आता प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेची नासधुस करणाऱ्या दंगलखोरांना हेरून ठेवले होते. या सगळ्यांविरोधात शनिवारपासून कारवाई सुरु झाली. यामध्ये दंगलखोरांची मालमत्ता जप्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#CAA ची अंमलबजावणी सुरु; तीन पाकिस्तानी तरुणांना भारतीय नागरिकत्व


नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतात सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरले आहे. उत्तर प्रदेशातही गुरुवारपासून या आंदोलनाचा भडका उडाला होता. यामध्ये आतापर्यंत १८ लोकांचा बळी गेला आहे. 



या पार्श्वभूमीवर योगी सरकारने दंगलखोरांना आवर घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ साली दिलेल्या एका आदेशाचा आधार घेत पोलिसांनी संशयित दंगलखोरांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये मिनाक्षी चौक आणि कच्ची सडक परिसरातील जवळपास ५० दुकानांचा समावेश आहे. आंदोलनाच्या काळात या भागांमध्ये सर्वाधिक हिंसाचार झाला होता. आंदोलनाच्यावेळी ही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, या दुकानांबाहेर लोकांची गर्दी असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या या कारवाईचा वेग आणि आवाका नजरेत भरण्याजोगा आहे. हिंसक कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी इतक्या तातडीने कारवाई सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


माझा जन्म पाकिस्तानात झालाय, मी पुरावा कुठून आणायचा- मणीशंकर अय्यर