Shocking News : उत्तर प्रदेशच्या बांदामधून (Banda Uttar pradesh) एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. बांदामध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानात आणलेला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह रुग्णालायत नेण्यात आला होता. अंत्यसंस्कार सुरु असतानाच चितेतून उचलून घाईघाईने कापडात गुंडाळून या वृद्ध व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. आजाराने मृत्यू झाल्यानंतर वृद्ध व्यक्तीला स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलं होतं. मात्र चितेवर ठेवल्यानंतर ती वृद्ध व्यक्ती हालचाल करु लागल्याने नातेवाईकांनी त्याला चितेवरुन थेट रुग्णालयात दाखल केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय त्याला अंत्यसंस्कारासाठी मुक्तिधाममध्ये घेऊन गेले होते.  मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार चितेवर सुरू झाले होते. मात्र तेव्हा अचानक कुटुंबातील सदस्यांच्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात हालचाल दिसून आली. त्यानंतर कुटुंबीयांनी कापडाच गुंडाळलेला मृतदेह रुग्णालयात नेला. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्मशानभूमीतून आणलेला मृतहेद पाहून रुग्णालय प्रशासनात घबराट पसरली होती. नातेवाईकांनी पुन्हा मृतदेह नेऊन त्याच्यावर अंतिम संस्कार केले.


बांदा शहरातील शंभू नगर परिसरात राहणारे वृंदावन पाल यांचे वयाच्या 76 व्या वर्षी आजाराने निधन झाले होते. कुटुंबीयांनी त्यांना मुक्तीधाम येथे नेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मृतदेहही चितेवर ठेवला होता. अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक त्यांचे ओठ आणि गाल हलू लागले. त्यामुळे घरातील सदस्यांना वृदांवन पाल यांच्या शरिरात अजूनही जीव असल्याची शंका वाटू लागली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.पाल यांच्या मुलाने सांगितले की, वडिलांना तीन दिवसांपासून ताप होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी मुक्तिधाम येथे नेण्यात आले. तिथे त्यांच्या शरीरात हालचाल दिसून आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते.


डॉक्टरांनी काय सांगितले?


जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ विनीत सचान यांनी याबाबत अधिक माहिती दिली. "कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला की शरीराचे तापमान सतत कमी होत जाते. यामुळे कधीकधी स्नायूंमध्ये कडकपणा येतो. आतड्यांमध्ये आणि पोटात गॅस अडकल्यामुळे तो तोंडातून बाहेर पडतो. त्यामुळे मृतदेहाचे स्नायू हलतात. असे अनेकवेळा होते. या प्रकरणात देखील वृदांवन पाल यांच्या मृतदेहातून गॅस बाहेर पडल्याने शरीरात हालचाल होत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी ते जिवंत असल्याचे वाटले होते. पण त्याचा मृत्यू झाला होता, हृदयाने काम करणे बंद केले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घेऊन जाऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले," असे डॉ विनीत सचान यांनी सांगितले.