बापरे! पंख्यातून करंट आला आणि...; झटक्यात एकामागोमाग 4 भावंडांचा धक्कादायक मृत्यू
Unnao Childrens Death: घराबाहेर ठेवलेल्या पंख्यामध्ये विजेचा करंट पसरला. यानंतर एकामागोमाग एक चार मुलांना करंट लागला. यातच त्यांचा मृत्यू झाला.
Unnao Childrens Death: आपल्या घरात लहान मुले असतील तर प्रत्येक मिनिटाला त्यांच्याकडे लक्ष ठेवणे किती गरजेचे असते, हे पालकांना चांगलेच माहिती आहे. कारण 'नजर हटली आणि दुर्घटना घटली' असे प्रकार घडत असतात.असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या उन्नावमधून समोर आला आहे. येथे 4 मुलांचा करंट लागून धक्कादायक मृत्यू झाला आहे. बारासागर क्षेत्रातील लालमन खेडे गावात ही घटना घडली. येथे घराबाहेर ठेवलेल्या पंख्यामध्ये विजेचा करंट पसरला. यानंतर एकामागोमाग एक चार मुलांना करंट लागला. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घर आणि गावात एकच शोककळा पसरली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरु केली.
वाईट म्हणजे मृत पावलेली चारही मुले-मुली ही 9 वर्षाच्या आतील आणि एकाच परिवारातील होती.लालमन खेडे गावातील रहिवाशी विरेंद्र कुमार यांच्या घराबाहेर फर्राटा पंखा लावण्यात आला होता. जवळच खेळणाऱ्या मुलांनी या पंख्याला हात लावला आणि ते पंख्याच्या करंटमध्ये आले. यानंतर 3 मुलेही त्याच्या जवळ पोहोचली आणि त्यांनाही करंट लागला.
करंट लागल्याने चारही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयंक (8), हिमांशी (8), हिमांक (6) आणि मानसी (4) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले भाऊ-बहिण होती. या घटनेनंतर गावकरीदेखील हळहळले आहेत. बारासागर पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. यानंतर ठाणे अध्यक्ष दिलीप प्रजापति घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. यासंदर्भातील पुढील कार्यवाही सुरु आहे.
भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याला घराबाहेरच संपवलं
उत्तर प्रदेशमध्ये लहान मुलाच्या बाबती आणखी एक धक्कादायक घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत चालल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. अनेकदा भटक्या कुत्र्यांकडून चिमुकल्यांना लक्ष्य केलं जातंय. यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. अशातच उत्तर प्रदेशातही एका पाच वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी बळी घेतला आहे. आईला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद करण्यात आली असून नागरिकांकडून कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका ५ वर्षाच्या चिमुरड्यावर रस्त्यावरच्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. आईला शोधण्यासाठी पाच वर्षांचा चिमुकला घराबाहेर पडला होता. मात्र रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी त्याला लक्ष्य केले आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.