लखनऊ : मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता धार्मिक अभ्यासक्रमासोबतच एनसीआरटीचा अभ्यासक्रम देखील शिकवला जाणार आहे. यासोबतच एनसीसी, स्काऊट गाईड याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. मदरशांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना एनसीआरटीची पुस्तके मोफत दिली जाणार असल्याचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मदरशांतील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. मदरशांमध्ये आता अरबी आणि उर्दू सोबत इंग्रजी, विज्ञान, गणित, हिंदी आणि इतर विषय देखील शिकवले जाणार आहेत. मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभुमीवर मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योगी सरकार एनसीसी आणि स्काऊट गाइड प्रशिक्षण शिबीर सुरु होत आहे.



राज्यात पाचशेहून अधिक मदरसे 


उत्तर प्रदेशमध्ये सध्या पाचशेहून अधिक मदरसे सुरू आहेत. यामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिकत असतात. राज्यांतील सरकार मदरशांसाठी वेगळा निधी देते. यासोबतच शाळा आणि शिक्षकांच्या पगाराचा खर्च देखील राज्य सरकार देते. मदरशांप्रती उत्तर प्रदेश सरकार अधिक संवेदनशील पाहायला मिळत आहे. याआधी मदरशांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, शिक्षकांची फळी तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय योगी सरकारने घेतले आहेत.