UPSC Topper Ishita:  केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (Union Public Service Commission) निकाल जाहीर झाले आहेत. अत्यंत कठीण असणाऱ्या या केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेत इशिता किशोरने (Roll Number: 5809986) बाजी मारली आहे. इशिता किशोर (Ishita Kishore) संपूर्ण देशातून पहिली आली आहे. यानंतर इशितावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून घराबाहेर लोकांनी रांगा लावल्या आहेत. इशिताने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली आहे. इशिताने दिल्लीमधील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

UPSC CSE 2022 परीक्षेत देशातून पहिली आलेली इशिता आधीपासूनच अभ्यासात हुशार असून नेहमीत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. एअरफोर्स बालभारती शाळा आणि श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण घेणाऱ्या इशिताने लहानपणीच आयएएस अधिकारी होण्याचा निश्चय केला होता. 


इशिता किशोरचे वडील हवाई दलात अधिकारी आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब ग्रेटर नोएडामध्ये वास्तव्यास आहे. इशिताने 2014 मध्ये बालभारती शाळेतून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर 2017 मध्ये श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. युपीएससी परीक्षेत हा तिचा तिसरा प्रयत्न होता. 



इशितादेखील इतर सर्व उमेदवारांप्रमाणे आतुरतेने निकालाची वाट पाहत होती. पण आपण टॉपर होऊ याची तिला अजिबात कल्पना नव्हती. निकाल येताच सगळीकडे इशिताच्या नावाची चर्चा सुरु झाली. यानंतर तिने आपल्या आईशी संवाद साधला असता त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 


आपले वडील नेहमी देशसेवेसाठी तत्पर असायचे. लहानपणी त्यांना देशसेवा करताना पाहिल्यानंतर आपणही मोठे झाल्यावर देशाची सेवा करायला मिळेल अशीच नोकरी करायची असा मी निश्चय केला होता असं इशिता सांगते. आपण घरीच सर्व अभ्यास केला. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे माझे पर्यायी विषय होते अशी माहिती तिने दिली आहे. 


दरम्यान यावेळी आपण उत्तीर्ण होऊ असं वाटलं होतं का? असं विचारण्यात आलं असता तिने सांगितलं की "मुलाखतीदरम्यान सर्व एक्सिरेंट्सना आपली निवड होईल अशी आशा असते. मी फार मेहनत केली होती. त्यामुळे यावेळी माझी निवड होईल असा आत्मविश्वास होता". 


5 जून 2022 रोजी UPSC CSE 2022 परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी एकूण 11 लाख 35 हजार 697 उमेदवारांनी अर्ज केला होता. यामधील 5 लाख 73 हजार 735 उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते. सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या लेखी (मेन्स) परीक्षेसाठी एकूण 13 हजार 90 उमेदवार पात्र ठरले होते. एकूण 2529 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झाले होते. यानंतर आज 23 मे रोजी परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.