ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन, पंतप्रधान मोदींकडून स्वागत
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन
अहमदाबाद : भारतात महासत्तेच्या प्रमुखांचं आगमन झालं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एअररफोर्स वन विमान अहमदाबाद विमानतळावर उतरलं आहे. आपल्या मित्राचं स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यावेळी अहमदाबाद विमानतळावर उपस्थित आहेत. विमानतळाबाहेर दुतर्फा तिरंग्यासह अमेरिकेचा राष्ट्रध्वजही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. विमानतळावर ट्रम्प यांना भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल.
अहमदाबादमध्ये ट्रम्प आणि मोदी यांचा २२ किलोमीटर लांब रोड शो होईल. अहमदाबादमधल्या गांधी आश्रमाला दोघेही भेट देतील. त्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी महात्मा गांधींचा जीवन परिचय देणारी चित्र लावण्यात आली आहेत. त्यानंतर ते मोटेरा स्टेडिअमवर जातील. जगातल्या सर्वात मोठ्या अशा मोटेरा स्टेडिअमवर दुपारी ऐतिहासिक असा नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी काही वेळेपूर्वीच हिंदीमध्ये ट्विट केलं आहे की, 'आम्ही भारतात येण्यासाठी तत्पर आहोत. आम्ही रस्त्यात आहोत. काही वेळेतच सगळ्यांना भेटू.' यावर पंतप्रधान मोदी यांनी ही उत्तर देत म्हटलं आहे की, अतिथि देवो भव.
अमेरिकेच्य़ा राष्ट्राध्यक्षांचं अहमदाबादमध्ये स्वागत गुजराती पद्धतीने होणार आहे.