Cloth Mask against Omicron:  जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) दहशत पसरवली आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये (Omicron Cases in India) दिवसेंदिवस वाढ होत आहे. ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनापासून (Corona Virus) बचाव करण्यासाठी बाहेर पडताना कायम मास्क (Cloth Mask) वापरा, सुरक्षित अंतर राखा, गर्दी टाळा असं आवाहन केलं जातं. अनेक जण नियमांचं पालन करत मास्कचा वापरही करतात. पण जर तुम्ही कापडी मास्क वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.


कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनला रोखण्यासाठी कापडी मास्क बिलकूल कामाचा नाही. अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ लीना वेन यांनी याबाबतचा इशारा दिला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग थांबवायचा असेल, तर केवळ थ्री लेअर मेडिकल मास्कच वापरला पाहिजे, असं डॉ वेन यांनी सांगितलं आहे. 


भारतीय मास्कबाबत किती सजग
भारतात अनेकांनी मास्क वापरणंच सोडून दिलंय. त्यातही जे मास्क वापरतायत, त्यात सर्जिकल मास्क वापरणारे अगदीच नगण्य आहेत. कापडाचे फॅशनेबल मास्क वापरणंच लोक पसंत करतात. साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग मास्कही आता मिळतात. मात्र ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग पाहता हे मास्क बिनकामाचे असल्याचं स्पष्ट होतं आहे.



ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग कोविड 19 व्हायरसपेक्षा तिप्पट 
2 डिसेंबरला देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. अवघ्या 19 दिवसांत हा आकडा 200 झाला. कोविड 19 च्या मूळ व्हायरसच्या 200 केसेस व्हायला 60 दिवस लागले होते. त्यामुळे ओमायक्रॉन फैलावण्याचा वेग 318 टक्के असल्याचं स्पष्ट होतंय. मूळ व्हायरस दिवसाला सरासरी 3.3 लोकांना संक्रमित करत होता. तर ओमायक्रॉन दिवसाला सरासरी 10.5 लोकांना बाधित करतोय. 


साधे मास्क वापरूनही ओमायक्रॉन फैलावत असल्याची शक्यता त्यामुळंच बळावलीये. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानंतर अल्पावधीतच 100 देशांमध्ये त्याचा फैलाव झालाय. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर सर्जिकल मास्क वापरणं आणि कोविड नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे.