उत्तर प्रदेशात ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका शाळेमधल्या ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावं लागलंय.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका शाळेमधल्या ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावं लागलंय.
शाळेजवळ असलेल्या एका साखर कारखान्यातून विषारी वायूची गळती झाल्यामुळे ही घटना घडलीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश सहारनपूरच्या आयुक्तांना दिले आहेत.
सर्व विद्यार्थी सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलंय. यापूर्वीही या शाळेमध्ये अशी घटना घडल्याचं सांगण्यात येत असून त्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जातोय. मात्र साखर कारखान्यातला कचरा मोकळ्या जागेत फेकला जात असल्यामुळे विषारी वायू पसरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.