`भाजपच्या राम मंदिर ठरावावेळी संजय राऊत यांचा जन्मही झाला नसेल`
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमकी झडताना बघायला मिळतायत.
लखनऊ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमकी झडताना बघायला मिळतायत. राम मंदिर हा न्यायालयीन विषय नसून आपल्या आस्थेचा मुद्दा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवसैनिकांनी बाबरी मशिद जमीनदोस्त केली. आता मंदिर उभारणं हा आमच्या भावनेचा मुद्दा असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचे उत्तर प्रदेशातही पडसाद उमटल्याचं बघायला मिळालं. भाजपानं कार्यकारिणीत राम मंदिराचा ठराव केला, त्यावेळी कदाचित राऊत यांचा जन्मही झाला नसेल, अशा शब्दांत उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी पलटवार केलाय.
येत्या २४ नोव्हेंबरपासून उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. २५ नोव्हेंबरला ते रामजन्मभूमी जागेचे दर्शन घेतील. त्यानंतर ते संत-साधूंच्या भेटीगाठी घेतील. यावेळी उद्धव अयोध्येत जाहीर सभादेखील घेणार आहेत.
अयोध्या दौऱ्यामध्ये हिंदीत भाषण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कसून तयारी करत आहेत. हिंदी शब्दांचे व्यवस्थित उच्चार आणि हिंदी भाषेतून प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी त्यांचा सराव सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची ही राज्याबाहेरील पहिलीच मोठी जाहीर सभा असेल. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह पक्षाचे नेते यापूर्वीच अयोध्येत दाखल झालेत.