उत्तरप्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव
उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा दणका बसला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीने विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपला मोठा दणका बसला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीने विजय मिळवला आहे.
गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदार संघ तर फुलपूर हा उपमुख्यमंत्री प्रसाद मौर्य यांचा मतदार संघ आहे. फुलपूर येथून समाजवादी पक्षांचे नागेंद्र प्रताप सिंह पटेल तर गोरखपूर येथून समाजवादी पक्षांचे प्रविण कुमार निशाद यांचा विजय झाला. एकापाठोपाठ वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्ता हस्तगत करणा-या भाजपसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातच भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागा भाजपासाठी महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झाली होती. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने फुलपूरची जागा रिकामी झाली होती.
गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उपेंद्र दत्त शुक्ला आणि फुलपूमधून कौशलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली होती. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून काँग्रेस स्वबळावर लढलीय.