नवी दिल्ली : अयोध्येत शनिवारी शिवसेना आणि रविवारी होणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामुळे वातावरण तणावग्रस्त झालंय. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावलीय. ही बैठक शनिवारी लखनऊमध्ये सायंकाळी उशिरा आठ वाजता होणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री योगी एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. 


उद्धव ठाकरे अयोध्येत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत राममंदिरासाठी येत्या दोन दिवसात जोरदार वादळ उठणार अशी शक्यता आता निर्माण झालीय. विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटनांमध्ये राम मंदिराचा मुद्द्यावर अयोध्येत सुंदोपसुंदी सुरू आहे. उद्या आणि परवा असा दोन दिवसांचा उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आलाय. त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येत पोहचले आहेत. प्रत्यक्ष अयोध्येतही या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे.


शिवसैनिक अयोध्येत 

शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होती. इथं ते साधुसंतांची भेट घेऊन सायंकाळी ६ वाजता सरयू घाटावर आरतीत सहभागी होतील. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित असणार आहेत. 


२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास ते राम जन्मभूमीत रामललाचे दर्शन करतील. शिवसेनेच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोन रेल्वे भरून शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. पहिली रेल्वे काल पोहचली होती तर दुसरी रेल्वे आज सकाळी ७.१५ वाजता अयोध्येत दाखल झाली.


'राम मंदिरासाठी कायदा करा'


केंद्र सरकारनं राम मंदिरासाठी कायदा करावा, त्याला संसदेमध्ये शिवसेना पाठिंबा देईल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. आम्ही १७ मिनिटात बाबरी मशीद पाडली... मग भाजपला कायदा बनवायला किती वेळ लागणाराय? असा सवालही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रपती भवनापासून ते उत्तर प्रदेशापर्यंत भाजपची सत्ता आहे. पंतप्रधानांची इच्छा असेल तर ते काहीही करू शकतात अशा शब्दांत त्यांनी भाजपाला छेडलं. उद्धव ठाकरे आज अयोध्येमध्ये पोहोचणार असून या दौऱ्यामुळे मंदिर उभारण्यासाठी दबाव निर्माण होईल, असा दावाही राऊत यांनी केलाय. २०१९मध्ये पुन्हा राममंदिराचं आश्वासन देत निवडणुकीला सामोरं जाणं शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळेच 'पहले मंदिर फिर सरकार' अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी दिल्याचं राऊत म्हणाले.