`सनातन धर्म हाच आपला राष्ट्रीय धर्म`, योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान, काँग्रेस म्हणालं `शीख, बौद्ध संपले का?`
सनातन धर्म हाच राष्ट्रीय धर्म असल्याचं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. तसंच अयोध्येतील राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर देशातील धार्मिक ठिकाणांचा जीर्णोद्धार केला पाहिजे असंही मत त्यांनी मांडलं आहे. योगींच्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे.
Yogi Adityantah on Sanatan Dharma: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityantah) यांनी मोठं विधान केलं असून सनातन धर्म (Sanatan Dharma) हाच आपला राष्ट्रीय धर्म असल्याचं म्हटलं आहे. तसंच प्रत्येक नागरिकांने या धर्माचा आदर केला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. जर मागील काळात धार्मिक ठिकाणं उद्ध्वस्त किंवा अपवित्र करण्यात आली असतील तर अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Temple) पार्श्वभूमीवर त्यांनाही पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी एक मोहीम चालवली पाहिजे असं मत योगी आदित्यनाथ यांनी मांडलं आहे.
"सनातन धर्म हा आपल्या भारताचा राष्ट्रीय धर्म आहे. जेव्हा आपण स्वार्थापासून दूर होतो तेव्हा राष्ट्रीय धर्माशी जोडले जातो. जेव्हा आपण राष्ट्रीय धर्माशी जोडले जातो तेव्हा देश सुरक्षित असतो," असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. राजस्थानमधील भीनमाळ येथील नीळकंठ महादेव मंदिरातील मूर्तीच्या जीर्णोद्धार आणि अभिषेक कार्यक्रमाच्या ते अध्यक्षस्थानी. यावेळी ते बोलत होते.
"कोणत्याही काळात आपल्या धार्मिक स्थळांना अपवित्र करण्यात आलं असेल तर अयोध्येतील राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आपण त्या धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे तब्बल 500 वर्षांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. राष्ट्रीय भावना दर्शवणारं हे रामाचं भव्य मंदिर उभारण्यात तुम्ही सर्व भाविकांनी मोठं योगदान दिलं आहे, " असं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय जल ऊर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी रुद्राक्षाचे रोपण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशवासियांना आपल्या वारशांचा आदर आणि जतन करण्याचं वचन दिलं आहे. 1400 वर्षांनंतर भगवान नीलकंठ मंदिराचा जीर्णोद्धार हे वारशाचा आदर आणि संरक्षणाचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसची टीका
योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसच्या असंगठीत कामगार आणि कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष उदीत राज यांनी ट्वीट केलं आहे की "सनातन धर्म हाच राष्ट्रीय धर्म असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. याचा अर्थ शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्म संपले आहेत".
नोव्हेंबर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्या वादावर एकमताने निर्णय देताना, सर्व 2.77 एकर वादग्रस्त जमीन मंदिरासाठी दिली. मशिदीसाठी पाच एकर जागा द्यावी, असंही न्यायालयाने सरकारला सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराची पायाभरणी केली. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली की 1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर उद्घाटनासाठी सज्ज असेल.