अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येमध्ये गेले आहेत. ५ ऑगस्टला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी योगी आदित्यनाथ अयोध्येत आले आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी पाहण्याबरोबरच योगी आदित्यनाथ साधू-संतांचीही भेट घेतली. भूमिपूजनाचा कार्यक्रम भव्य करण्यासाठी अयोध्येमध्ये खास तयारी सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. तसंच त्यांनी लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना नव्या सिंहासनावर विराजमान केलं. याशिवाय योगींनी हनुमान गढीवर जाऊन हनुमानाचंही दर्शन घेतलं. यानंतर योगी कार्यशाळेत गेले आणि कारसेवकपुरममध्ये जाऊन संतांसोबत बैठकही घेतली. यानंतर योगी ५ वाजण्याच्या सुमारास गोरखपूरला रवाना झाले.


योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यामध्ये राम मंदिर परिसराचं निरीक्षण केलं. ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात काशीहून ५ विद्वान अयोध्येला जाणार आहेत. या ५ विद्वानांच्या देखरेखीमध्येच राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे.


काशीच्या या ५ विद्वानांमध्ये ३ ज्योतिषी आणि २ संतांचा समावेश आहे. हे ५ विद्वान ४ ऑगस्टलाच अयोध्येमध्ये पोहोचणार आहेत. हे विद्वान आपल्यासोबत काशी विश्वनाथ मंदिरातून बाबा विश्वनाथ यांच्या शिवलिंगाला स्पर्श केलेली ५ चांदीची बेल पत्र घेऊन येणार आहेत. या बेल पत्रावर जय श्रीराम लिहिलं असणार आहे. सोबतच त्यांच्यासोबत सवा पाव चंदन आणि गंगेतली मातीही असणार आहे.