Newly Married Assaulted Father In Law: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बांदा येथील एका नवविवाहितेने आपल्या सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पती घरी नसताना सासऱ्यांची माझ्यावर वाईट नजर होती असा आरोप या महिलेने केला आहे. कोणीही घरात नसताना माझे सासरे मला दारु पाजण्याचा आणि माझ्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न करायचे असंही या महिलेचं म्हणणं आहे. यासंदर्भात आपण पती आणि सासूकडे तक्रार केली असता आपल्याला सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. माहेरुन हुंडा आणण्याची मागणी सासरच्या व्यक्तींकडून केली जाते असं महिलेनं म्हटलं आहे. सासरच्या व्यक्तींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून या महिलेने अनेक गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


कुठेही वाच्यता करायची नाही असा दम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, हुंडा देऊन माझ्या घरच्यांनी 2022 मध्ये माझं लग्न लावून दिलं होतं असं या महिलेने पोलिसांना सांगितलं. मात्र लग्नानंतर माहेरुन हुंडा म्हणून अधिक पैसे घेऊन ये असे टोमणे मारत सासरच्या लोकांनी माझा छळ सुरु केला असं आरोप पीडितेने केला आहे. पती शेतात कामासाठी गेल्यानंतर सासरे माझ्यावर वाईट नजर ठेऊ लागले. ते काही ना काही कारणाने माझ्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा मला दारु पाजण्याचाही प्रयत्न केला. मी या सर्वाला विरोध केल्यानंतर मला मारहाण केली जायची. पती आणि सासूला यासंदर्भात सांगितल्यानंतर त्यांच्याकडूनही मारहाण व्हायची. तसेच या प्रकरणाची कुठेही वाच्यता करायची नाही असा दम देतानाच माहेरुन हुंड्याचे अधिकचे पैसे घेऊन ये असं पती आणि सासूकडून धमकावलं जायचं असा दावा महिलेने तक्रारीत केला आहे.


कोणी घरी नसताना सासऱ्यांनी...


22 जून रोजी जेव्हा ही महिला घरात एकटी होती तेव्हा सासऱ्याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. सासऱ्यांनी माझी छेड काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी त्यांना धक्का देऊन माझ्या खोलीकडे पळाले. मी खोलीत गेल्यानंतर आतून दाराला कडी लावून घेतली. सायंकाळी मी माझ्या पतीला घडलेल्या प्रकराबद्दल सांगितलं असता सासऱ्यांना जाब विचारण्याऐवजी त्याने मलाच मारहाण केली, असा आरोप या महिलेने केला आहे. या मारहाणीनंतर त्याच रात्री ही महिला पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली. या महिलेला पती, सासू आणि सासऱ्यांशिवाय इतर नातेवाईकांनाही मारहाण केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. 


नक्की वाचा >> "माझा नवरा घरात Sex रॅकेट चालवतो"; महिलेने पोलिसांना दाखवला लपून शूट केलेला Video


5 जणांविरोधात तक्रार दाखल


या प्रकरणासंदर्भात आता माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीच्या आधारे कारवाई करावी असे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी निवास मिश्र यांनी दिले आहेत. पोलिसांनी या महिलेचा पती, सासू, सासरे आणि अन्य 2 व्यक्तींविरोधात छळ, छेडछाड, हुंड्यासाठी छळ करणे, मारहाण करणे या गुन्ह्यांअंतर्गत तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास हाती घेतला असून आरोपींना लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं म्हटलं आहे.