कावड यात्रेत डीजेचे राजकारण, अखिलेश सरकारविरुद्ध घोषणा
डीजे बजवा दिये योगी ने, भोले नजवा दिये योगीने
लखनऊ: उत्तर प्रदेशात सध्या कावड यात्रेच्यानिमित्ताने राजकारण रंगल्याचे दिसत आहे. ही यात्रा अंतिम टप्प्यात मार्गक्रमण करत आहे. यादरम्यान योगी सरकारकडून यात्रेकरुंना खूश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या सगळ्यात डीजे आणि हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी चर्चेचा विषय ठरत आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावेड यात्रेच्या मार्गाची हवाई पाहणी केली होती. यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून यात्रेकरुंवर पुष्पवृष्टीही केली होती. त्यानंतर मेरठचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनीही हाच कित्ता गिरवला. पुष्पवृष्टी होत असताना यात्रेकरुंकडून 'डिजे बजवा दिये योगी ने, भोले नचवा दिये योगी ने' अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.
या माध्यमातून यापूर्वीच्या सरकारला लक्ष्य करण्यात आले होते. समाजवादी पक्षाची सत्ता असताना मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्यभरात डीजेवर बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर अत्यंत रंजक घोषणा यात्रेकरुंकडून देण्यात आल्या. 'अखिलेश ने हुकूम सुनाया था, डीजे पर बॅन लगाया था, २०१७ के चुनाव मे भोले ने उसे हराया था, छक्के छुडा दिये योगी ने', अशा घोषणा सातत्याने ऐकायला मिळत आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारकडून कावड यात्रेच्यानिमित्ताने पारंपरिक मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होत आहे. मेरठमधील मांसाहारी हॉटेल्समध्ये सध्या केवळ शाकाहारी खाद्यपदार्थच मिळत आहेत.