गायिकेचं गाणं ऐकून पोलीस थेट दरवाजावर पोहोचले, Social Media वर तुफान चर्चा
योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Adityanath Government) टीका करणारं उपहासात्मक गाणं गायल्याने पोलिसांनी (UP Police) गायिकेला नोटीस पाठवली आहे. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल का करु नये? अशी विचारणा पोलिसांनी गायिकेला केली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवस देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका गायिकेला पोलिसांनी नोटीस (Police Notice) पाठवली आहे. याचं कारण म्हणजे गायिकेने योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Adityanath Government) उपहासात्मकपणे भाष्य करणारं एक गाणं गायलं आहे. कानपूरमध्ये झोपडपट्टीवर कारवाई करत असताना एका आई आणि मुलीचा जळून मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर गायिकेने गाणं गात योगी सरकारला लक्ष्य केलं. नेहा सिंग राठोड (Neha Singh Rathore) असं या गायिकेचं नाव आहे.
नेहा राठोडने 'यू पी में का बा!' (UP Mein Ka Ba) या आपल्या व्हायरल गाण्याच्या (Viral Song) चालीवर योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. गेल्या आठवड्यात कथितपणे पोलिसांनी लावलेल्या आगीत 45 वर्षीय प्रमिला दिक्षित आणि त्यांची मुलगी 20 वर्षीय नेहा यांचा जळून मृत्यू झाला होता. यावर नेहा राठोड यांनी गाण्यातून भाष्य केलं.
दरम्यान नेहा राठोड यांनी हे गाणं गायल्यानंतर पोलीस त्यांच्या दारावर पोहोचले. नेहा राठोड यांच्या गाण्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली असल्याचं पोलिसांचा म्हणणं आहे. पोलिसांनी नेहा राठोड यांना नोटीस बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवस दिले आहेत. या गाण्याची निर्मिती कशी झाली याचं उत्तर त्यांना द्यायचं आहे.
पोलिसांनी नेहा राठोड यांना गाण्यात त्याच आहेत का? अशी विचारणा केली असून त्यांनीच गाणं लिहिलं आहे का आणि त्यावर त्या ठाम आहेत का? असंही विचारलं आहे. तसंच या व्हिडीओची समाजात काय प्रतिक्रिया उमटू शकते याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? असंही पोलिसांनी विचारलं आहे.
"या गाण्यामुळे समाजात शत्रुत्व आणि तणाव निर्माण झाला आहे आणि तुम्ही यावर तुमची भूमिका स्पष्ट करण्यास कायदेशीररित्या बांधील आहात. त्यामुळे तुम्हाला नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत तुमचे उत्तर दाखल करणे आवश्यक आहे," असं पोलिसांनी नोटीशीत सांगितलं आहे. जर तुमचं उत्तर समाधानकारक नसेल तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास केला जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.