मुंबई : 'झुमका गिरा रे.... बरेली के बाजार मे....' हे गाणं आठवतंय का ? बऱ्याच वर्षांपूर्वीपासून म्हणजेच जवळपास १९६६ मधील एका हिंदी चित्रपट गीतातून या 'झुमक्या'ची गोष्ट आपल्या कानी पडली आहे.  तेव्हापासून बरेली, तेथील बाजार आणि झुमका हा कोणासाठीच नवा नाही. असा हा झुमका अखेर बरेलीच्या बाजारातच मिळाला आहे. तेसुद्धा नव्या रुपात. त्यामुळे आता 'झुमका' मिला रे बरेली के बाजार मे....  असं अनेकजण म्हणताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय महामार्ग २४वर असणाऱ्या पारसाखेरा येथे एका झुमक्याची प्रतिमा उभारण्यात आली आहे. ज्याची उंची १४ फूट इतकी आहे. इथे येणाऱ्याजाणाऱ्यांसाठी हा झुमका आकर्षणाचा विषय ठरत आहे. ज्यावर बरेलीतील जरी एम्ब्रॉयडरी, विविध प्रकारची रत्नडित सजावट करण्यात आली आहे. Bareilly Development Authority (BDA)कडून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी म्हणून हा झुमका उभारण्यात आला आहे. 


झुमक्यावरुन राजकारणाला सुरुवात... 


बरेली येथे 'झुमका तिराहा' उभारण्यात आल्यामुळे एकिकडून पर्यटकांनी या ठिकाणाकडे आकर्षणाचा विषय म्हणून पाहणं सुरु केलं असतानाच दुसरीकडे या झुमक्यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. 


'नवभारत टाईम्स'च्या वृत्तानुसार, एका भाजप नेत्यानेच याप्रकरणी आवाज उठवला आहे. डॉ. श्याम बिहारी लाल यांच्या म्हणण्यानुसार या गौरवशाली शहराची ओळख दाखवण्यासाठी य़ांना झुमकाच मिळाला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.



बरेलीची ओळख म्हणजेच हा झुमका असं भासवणं म्हणजे या शहराच्या संस्कृतीचं दिवाळं निघाल्याचं प्रतिक आहे, असं दाखवणं अशी भूमिका त्यांनी मांडली. 'बरेली की बर्फी' या चित्रपटाशीही बरेली हे नाव जोडलं गेलं आहे. मग आता काय, 'बर्फी चौक'ही उभारायचा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.