देहरादून : अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या चार धाम यात्रेपैकी एक असणाऱ्या बद्रीनाथ देवस्थानाकडून एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. २०१९ या वर्षात यात्रेसाठी मंदिराचे द्वार खुले होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. वसंत पंचमीचं औचित्य साधत नरेंद्र नगर राजदरबार येथे आयोजित एका समारंभात मंदिराची कवाडं खुली होण्याची तारीख जाहीर करण्यात आली. १० मे रोजी पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी मंदिराचे दरवाचे खुले करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रोपचार आणि संपूर्ण विधींसह मंदिराचे द्वार भक्तांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासन अधिकारी आणि पुजाऱ्यांकडून देण्यात आली. चार धाम यात्रेमध्ये चारही मंदिरांचे दरवाजे थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांमध्ये बंद होतात. ज्यामध्ये बरर्दीनाथ मंदिराचाही समावेश आहे. मंदिर परिसरात बर्फाची चादर पसरत असल्यामुळेच यात्रा काही काळासाठी बंद करण्यात येते. ज्यानंतर पुढे एप्रिल- मे महिन्याच्या सुमारास मंदिरं भक्तांच्या दर्शनासाठी पुन्हा खुली करण्यात येतात. 



बद्रीनाथ मंदिर ज्या काळासाठी बंद ठेवण्यात येतं तेव्हा जोशीमठ येथील नरसिंह मंदिरातून बद्री विशालचीही पूजा करण्यात येते. देशातून आणि देशाबाहेरून दरवर्षी लाखो भाविक बद्रीनाथ मंदिर दर्शन आणि चारधाम यात्रेसाठी येतात. समुद्रसपाटीपासून १० हजार २७९ फूट उंचीवर असणाऱ्या बद्रीनाथ धाम मंदिराकडेही अतिशय महत्त्वपूर्ण दृष्टीने पाहिलं जातं. त्यामुळे यंदाच्या वर्षी यात्रेला जाणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.