बचावकार्य करणारं हॅलिकॉप्टर कोसळलं, पायलटसहीत तीन जण मृत्युमुखी
रविवारी उत्तरकाशीत ढगफुटी झाल्यानंतर इथे एकच हाहाकार उडालाय
उत्तरकाशी, उत्तराखंड : उत्तराखंडच्या उत्तरकाशीतल्या मोलडी गावाजवळ एक हॅलिकॉप्टर कोसळलंय. मिळालेल्या माहितीनुसार, बचावकार्यात सहभागी असणारं हे हेलिकॉप्टर काही सामान घेऊन टिकोची गावाकडे निघालं होतं. अपघातावेळी या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण उपस्थित होते. हे तिघेही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याचं सांगण्यात येतंय.
रविवारी उत्तरकाशीत ढगफुटी झाल्यानंतर इथे एकच हाहाकार उडालाय. ढगफुटी झाल्यानंतर भूस्खलनामुळे या भागाचा चेहरा-मोहराच बदलून गेलाय. डोंगर कोसळल्यानं अनेक घरं मलब्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. अनेक मुकी जनावरंही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलीत. आराकोट, मोलडी, मोल्डा, सनेल, टिकोची आणि द्विचाणू यांसारख्या भागातील वाचलेले नागरिक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्या मदतीसाठीच हे हेलिकॉप्टर बचावकार्यात जुंपलं होतं.