Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची 16 व्या दिवशी सुटका होण्याची दाट शक्यता आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री किंवा 29 नोव्हेंबरच्या सकाळी या कामगारांना बाहेर काढलं जाईल असं सांगितलं जात आहे. मात्र मागील 16 दिवसांपासून अडकलेल्या या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एकीकडे यंत्रणा झटत असतानाच त्यांना जवळपास 3 आठवडे या बोगद्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठीही विशेष मेहनत घेतली जात आहे.


नक्की घडलंय काय आणि कुठे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित, सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम 'ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा एक भाग आहे. ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे 41 कामगार बोगद्यात अडकले. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे 60 मीटरचा भाग खचल्याने 41 कामगार अडकले. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या 2 किलोमीटर लांबीच्या भागात हे कामगार अडकले असल्याने ते आतमधील पोकळीत सुरक्षित आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी 16 दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. एकीकडे या कामगारांपर्यंत पोहचण्यासाठी अगदी परदेशी तज्ज्ञांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्व गोष्टींचा वापर केला जात असतानाच त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.


मानसोपचारतज्ज्ञ, योगा अन्...


हे कामगार ज्या ठिकाणी अडकले आहेत तिथे वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. कामगारांना पाइपलाइनद्वारे अन्नासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. अत्याधुनिक कॅमेऱ्याद्वारे घेतलेली या कामगारांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याचं व्हिडीओ शुटींग करण्यात आलं. मदत करणाऱ्या यंत्रणांनी ही व्हिडीओ क्लिप प्रसृत केली आहे. आणि कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री पटण्याबरोबरच त्यांच्या सुटकेसाठी आशेचा नवा किरण या व्हिडीओनंतर दिसू लागला. अडकलेले कामगार नियमित चालणे, योगासने आणि आपल्या प्रियजनांशी बोलणे करून बोगद्याच्या आत मृत्यूशी झुंज देत आहेत. या कामागारांचं मानसिक आरोग्य निरोगी रहावं म्हणून सरकारने मनोचिकित्सक डॉ. अभिषेक शर्मा यांना नियुक्त केलं आहे. “आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांचे मनोबल टिकवण्यासाठी योगासने, चालणे आणि प्रियजनांशी बोलून एकमेकांना प्रोत्साहन देणे यासारखे नियमित उपक्रम सुचवले आहेत,” असं शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत सांगितलं. 


अनेक वस्तू पाठवण्यात आल्या


या दुर्घटनेनंतर 10 दिवसांनी बोगद्याच्या आत ढिगाऱ्यातून सहा इंच रुंदीची पाइपलाइन टाकण्यात आली. त्याद्वारे या कामगारांना पौष्टीक खाणं दिलं जातं. ज्यामध्ये दलिया, खिचडी, केळी, सफरचंद आणि पाणी पाठवलं जातं. तसेच मोबाईल चार्जर आणि इतर अत्यावश्यक गोष्टीही त्यांना पाठवण्यात आल्यात. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडचे ​​संचालक अंशू मनीष खालखो यांनी दर काही तासांनी कामगारांशी संवाद साधला जात असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं. “आम्ही दर अर्ध्या तासाने अन्न पाठवत आहोत आणि दर २-३ तासांनी संवाद साधत आहोत. “विविध राज्यातील अधिकारी, नातेवाईक आणि वैद्यकीय तज्ज्ञ देखील त्यांच्याशी नियमितपणे बोलत आहेत,” असं खालखो यांनी सांगितलं.


अनेक संस्था मदतकार्यात सहभागी


अनेक सरकारी आणि निमसरकारी संस्था या मदतकार्यामध्ये सहभागी झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी), तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सतलज जलविद्युत निगम, रेल विकास निगम लिमिटेड या 5 संस्थांचा बचावकार्यात समावेश आहे. या मोहिमेत सर्व संस्थांनी एकत्र येत या 41 जणांच्या बचावकार्याची 5 पॉइण्ट अॅक्शन प्लॅन ठरवला. पाचही संस्थांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी खोदकामाची जबाबदारी स्वीकारली. या 5 संस्थांबरोबरच बाॅर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि इंडो-तिबेट बाॅर्डर पोलीस या यंत्रणांचे 160 कर्मचारी घटनास्थळी मदतकार्यात सहभागी झालेत.


एवढे दिवस का लागले?


हिमालायीन भागांत रेल्वे प्रकल्प रस्ते प्रकल्प पूर्ण करणे हे कायमच आव्हानात्मक ठरते. मात्र, दुर्घटनेनंतर बचावकार्य लवकर होणे अपेक्षित असते. मायक्रो टनेलिंग तज्ज्ञ ख्रिस कूपर आणि इंटरनॅशनल टनेलिंग ॲन्ड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष अरनाॅल्ड डिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र, राज्य पातळीवरील डझनभर संस्था कार्यरत असताना 41 कामगारांना वाचवण्यासाठी 16 दिवस उलटून गेल्यानंतरही एकही कामगार बाहेर आलेला नाही असं का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मात्र या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती पाहिल्यास येथे होणारं भूस्खलन आणि दगडांच्या विशिष्ट रचनेमुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत असल्याचं यंत्रणांचं म्हणणं आहे. एकाच वेळी 5 पातळ्यांवर बचावकार्य सुरू होते. मात्र, अडथळ्यांमुळे अनेकदा बचावकार्य ठप्प झाले. घटनास्थळाचा भाग दुर्गम असल्याने अत्याधुनिक यंत्रसामग्रीची उपलब्धतेचेही मोठे आव्हान आहे. कधी यंत्रं बंद पडणे तर कधी इतर कारणांमुळे अनेकदा बचावकार्य थांबवावं लागलं आहे. देशभरातील अनेक भागांबरोबरच अमेरिकेतून अशी यंत्रे आणण्यात आली आहेत. मात्र या ठिकाणी मोठे बोगदे बांधताना आपत्कालीन परिस्थितीचा विचार करण्यात आलेला नाही असा आरोप होताना दिसत आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुटकेचे मार्ग तयार करणे आवश्यक असताना तशी काही व्यवस्थाच करण्यात आलेली नाही, असा आरोपही आता होत आहे. मात्र सध्या कामगारांना सुरखरुप बाहेर काढण्यास प्राधान्य दिलं जात आहे.