उन्नाव : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने (Yogi Government) उन्नाव बलात्कार पीडितेच्या (Rape Victim) कुटुंबियांना २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमला रानी वरुण यांनी पीडितेच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तसंच पीडितेच्या कुटुंबियांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर देण्याचंही सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅबिनेट मंत्री कमला रानी वरुण यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधीच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबाबत चर्चा केली आहे. योगी सरकारच्या कॅबिनेट मंत्री कमला रानी, स्वामी प्रसाद मौर्या आणि भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी शनिवारी उन्नाव बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. याप्रकरणी दु:ख व्यक्त करत कॅबिनेट मंत्र्यांनी कुटुंबियांना सर्वप्रकारे मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. 


उन्नावमधील तरुणीवर गेल्या वर्षी सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला ३० नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. तर दुसरा आरोपी फरार आहे. पीडिता गुरुवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी याच खटल्याच्या सुनावणीसाठी रायबरेलीला जाण्यासाठी बसवारा रेल्वे स्टेशनकडे निघाली असताना, दोन आरोपी आणि त्यांच्या तीन साथीदारांनी गावाबाहेर शेतात तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवलं. यात पीडिता ९० टक्क्यांहून अधिक भाजली. त्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 



मात्र, ६ डिसेंबर शुक्रवारी रात्री ११. ४० वाजता पीडितेचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री तिला कार्डियक अरेस्ट आला. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी तिने डॉक्टरांना मी वाचेल का? असा सवालही केला होता. पीडितेने तिच्या भावाला माझा मृत्यू झाला तरी, आरोपींना सोडू नका असं म्हटलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अयशस्वी ठरली.