Joshimath Landslide : उत्तराखंडमध्ये (Uttrakhand) 2013 साली आलेल्या महापूराने सर्वांनाच हादरवून सोडलं होते. या महापूरात अनेकांचा बळी गेला. या महापूराने केदारनाथमध्ये मोठी हानी केली होती. आता पुन्हा एकदा नव्या संकटाचा सामना उत्तराखंडला करावा लागतोय. देवभूमी उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshimath News) शहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने खचत आहे. जोशीमठ शहराच्या भिंतींना तडे गेले आहेत, जमीन खचली आहे. अनेक घरांमधून पाणी वाहत आहे. बद्रीनाथ (Badrinath) धामपासून अवघ्या 50 किमी अंतरावर असलेल्या जोशीमठमध्ये सर्वच ठिकाणी तडे गेलेले रस्ते आढळून येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटकांची संख्या घटली


जोशीमठमधल्या या परिस्थितीमुळे हिवाळी पर्यटनावरही परिणाम होताना दिसत आहे. औली आणि जोशीमठमध्ये हिवाळ्यात दररोज सुमारे 2,000 पर्यटक येत असतात. मात्र भूस्खलनाच्या धसक्यामुळे पर्यटकांची संख्या 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. ही परिस्थिती पाहून पर्यटक हॉटेलमधील बुकिंगही रद्द करत आहेत. औली येथील रोपवे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता गाडीने पर्यटकांना जोशीमठ गाठावे लागत आहे.


लोकांनी घरातून काढला पळ


जोशीमठ येथील परिस्थिती पाहून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी बैठक बोलवली असून त्यामध्ये शास्त्रज्ञांपासून तज्ज्ञांचाही समावेश आहे. त्यामुळे सर्वात आधी लोकांना वाचवण्याचे प्राधान्य धामी सरकारचे असणार आहे. भूस्खलन, खचणारी जमीन, भिंतींना पडणाऱ्या भेगा यामुळे लोक दहशतीखाली आहेत. अनेकांच्या घरांना भेगा पडल्या असून जमिनी खचल्या आहेत. यामुळे लोकांना घरे सोडून पळ काढला आहे.


 



देवभूमिला धोका?


अनेक ठिकाणी जमिनीच्या आतून घाण पाण्याची गळती होत असल्याने लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच जलविद्युत प्रकल्प वसाहतीच्या भिंतींना तडे गेल्याने पाण्याचा प्रवाह वाढत आहे. आदिगुरू शंकराचार्यांच्या पौराणिक मंदिरालाही तडा गेला आहे. यामुळे धार्मिक स्थळांनाही मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय.


स्थानिकांचा आरोपांमुळे खळबळ


एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पामुळे डोंगर खचण्याची समस्या निर्माण झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याविरोधात लोकांनीही रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केलीय. जोशीमठमध्ये घरे खचत असल्याने येत्या काळात मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


नेमकं कारण काय?


भूवैज्ञानिकदृष्ट्या जोशीमठ हे शहर अतिशय संवेदनशील आहे आणि भूकंपीय क्षेत्र 5 अंतर्गत येते. हे शहर खचण्याची भीती याआधीच व्यक्त करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सरकारने तज्ज्ञांच्या एका पथकाला अहवाल तयार करायला सांगितले होते. अयोगरित्या झालेले बांधकाम, पाण्याची गळती, मातीची धूप आणि इतर अनेक कारणांमुळे पाण्याच्या प्रवाहाच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे जोशीमठ शहराच्या खाली विष्णुप्रयागच्या नैऋत्येस धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांचा संगम होतो. या नद्यांमुळे होणारी धूपही या भूस्खलनाला कारणीभूत ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे.