ISRO New Chairman Dr V Narayanan:   भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO च्या अध्यक्षपदाची कमान डॉ. व्ही नारायणन यांच्या हातात जाणार आहे. इस्त्रोचे सध्याचे अध्यक्ष  डॉ. एस. सोमनाथ 14 जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर  डॉ. व्ही नारायणन हे  ISRO चे अध्यक्ष होणार आहेत. भारताला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या रॉकेटची निर्मीती करणारे वैज्ञानिक अशी त्यांची ओळख आहे. जाणून घेऊया डॉ. व्ही नारायणन यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. एस. सोमनाथ यांच्या निवृत्तीनंतर डॉ. व्ही. नारायणन हे इस्रोचे नवे अध्यक्ष बनतील. केंद्राने दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली आहे. देशातील अव्वल शास्त्रज्ञांमध्ये नारायणन यांची गणना होते. डॉ. व्ही नारायणन हे सध्या इस्रोमध्ये लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (LPSC) चे संचालक आहेत. 1984 मध्ये इस्रोमध्ये रुजू झालेल्या या 'रॉकेट मॅन'च्या नावावर ऐतिहासिक कामगिरी आहे. डॉ. व्ही नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन तज्ञ म्हणून ओळखले जातात.


 तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील मेलाकट्टू येथे त्यांचा जन्म झाला. इस्रोच्या अनेक माजी अध्यक्षांप्रमाणेच डॉ. नारायणन यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला असून कठोर परिश्रमाने त्यांनी  भारतीय अंतराळ कार्यक्रमाचा चेहरा बनला आहे. भारत स्पेस स्टेशन तसेच गगनयान या महत्वपूर्ण मोहिमेवर काम करत असतानाच  डॉ. नारायणन यांचे मार्गदर्शन निश्चितच फायद्याचे ठरणार आहे. 


 नारायणन यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केला. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्समधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये असोसिएट मेंबरशिप मिळवली. आयआयटी खरगपूरमधून क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये एमटेक करत असताना त्यांनी रौप्य पदक जिंकले आणि नंतर एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली. 1984 मध्ये ISRO मध्ये रुजू होण्यापूर्वी, डॉ. नारायणन यांनी सुमारे दीड वर्षे खाजगी क्षेत्रात, TI डायमंड चेन लिमिटेड, मद्रास रबर फॅक्टरी (MRF) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये काम केले.


इस्रोमध्ये रुजू झाल्यानंतर डॉ. नारायणन यांनी सॉलिड प्रोपल्शनवर काम केले. ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (एएसएलव्ही) आणि पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) विकसित करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतरच ते लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (LPSC) चे संचालक झाले.  अनेक मोठ्या प्रकल्पांचे त्यानी नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, LPSC ने इस्रोच्या विविध मोहिमांसाठी 183 लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स निर्माण केले. 


डॉ. नारायणन हे GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचे प्रकल्प संचालक देखील होते.  पीएसएलव्हीच्या दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या उभारणीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 च्या प्रणोदन प्रणालीमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे.