किशोरवयीन मुलांचं लसीकरण सोमवारपासून, कसं कराल रजिस्ट्रेशन
लहान मुलांना घेण्यासाठीच्या लसीसाठी नोंदणी आजपासून सुरू होतेय.
मुंबई : अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान भारतात ओमायक्रॉनची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. यानुसार 3 जानेवारी पासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कोरोना लसीचा डोस मिळणार आहे.
तर लहान मुलांना घेण्यासाठीच्या लसीसाठी नोंदणी आजपासून सुरू होतेय. यासाठी मुंबई महापालिकेने देखील तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याबाबत नियमावली जाहीर केलीय. देशात वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका यामुळे लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ न दवडता लहान मुलांचंही लसीकरण करून घ्यावं.
कसं कराल रजिस्ट्रेशन
आजपासून CoWin पोर्टलवर लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी सुरू होणार आहे
यामध्ये स्टूडेंट आयडेंडिटी कार्ड ओळखपत्र म्हणून जोडू शकता
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर मुलांना लसीकरणासाठी सेंटर शोधावं लागेल
त्यानंतर वेळ ठरवून स्लॉट बूक करता येईल
सध्या देशातील मुलांना Covaxin दिलं जाईल
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून मुलांच्या लसीकरणासाठी कोविड पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीची सुविधा देण्यात आलीये. त्याचबरोबर 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणादरम्यान वॉक-इन करूनही लसीकरण करता येईल.
देशात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत 1300 हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात नोंदवली गेली आहेत. केरळमध्येही ओमायक्रॉनचे 44 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आतापर्यंत 23 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.