काय होतं जेव्हा डॉक्टरच्या एका हातात मोबाईल असतो अन् दुसऱ्या हाताने लस देतो...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण मोहिम सुरु आहे.
मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण मोहिम सुरु आहे. आतापर्यंत अनेक जणांनी कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. तर काही जण लस घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच आता एका महिलेला 30 सेंकंदामध्ये दोनदा लस दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सदर प्रकार हा राजस्थानमध्ये घडला आहे. (Vaccinator gives 2 corona vaccine dose for women during 30 seconds)
नक्की काय झालं?
सदर घटना 3 जुलैची असून हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील झुंझुनू येथील बाकरा गावातील आहे. गावातील महिला मायादेवी लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर पोहचल्या. मायादेवी लसीकरण केंद्रात दोन आरोग्यसेवक मोबाईलवर बोलत होते. त्यानंतर मायादेवी या 2 आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या टेबलवर लस घेण्यासाठी बसल्या. यानंतर फोनवर बोलत असलेल्या महिला वॅक्सीनेटरने मायदेवी यांना कोरोनाची लस दिली. यानंतर अवघ्या 30 सेंकदादरम्यान दुसऱ्या महिला वॅक्सीनेटरने मायादेवी यांना कोरोनाचा दुसरा डोस दिला.
वॅक्सीनेटर मोबाईलवर बोलत होत्या..
दुसरा डोस देत असताना मायादेवी यांनी वॅक्सीनेटर महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला. पण ती वॅक्सीनेटर महिला मोबाईलवर बोलत असल्याने तिने मायादेवी यांच्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा त्या वॅक्सीनेटरच्या सर्व प्रकार लक्षात आला तोवर फार उशीर झाला होता. मायादेवी यांना दोनदा लस दिल्याने त्यांना वैदयकीय पथकाच्या निगराणाखाली ठेवण्यात आले. पण मायादेवी यांना सुदैवाने काहीही त्रास झाला नाही. मायादेवी यांची प्रकृती स्थिर होती. त्यामुळे यानंतर मायादेवी यांना घरी सोडण्यात आले.
आरोग्य विभागाचा गलथानपणा
धक्कादायक प्रकार घडल्यानंतरही आरोग्य विभागाचा गलथानपणा पाहायला मिळतोय. या सर्व प्रकरणाला आता 4 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालाय. मात्र यानंतरही या प्रकरणाची ना चौकशी करण्यात आली ना दोषींवर कारवाई केली गेली.
मायादेवी काय म्हणाल्या?
या सर्व घटनेनंतर मायादेवी यांनी प्रतिक्रिया दिली. "दोनदा लसीकरण झाल्याने घाबरण्याचे काही कारण नाही", असं त्या वॅक्सीनेटर महिलांनी मला सांगितल्याचं मायादेवी यांनी स्पष्ट केलं. मायादेवी यांना आतापर्यंत कोणतीहा त्रास झालेला नाही. माझ्या पत्नीला काहीही झाल्यास त्याला आरोग्य विभाग जबाबदार असेल, अंस मायादेवी यांचे पतीनी स्पष्ट केलं.