`स्टॅच्यु ऑफ युनिटी` पाहण्याचा मुलांचा हट्ट पुरावयला गेले पण....
अतिशय धक्कादायक घटना
मुंबई : जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' बघण्यासाठी देश आणि विदेशातून हजारो संख्येने पर्यटक येत असतात. सुट्यांच्या दिवसांमध्ये येथील परिसर तर पर्यटकांनी भरलेला असतो. असंच रविवारी वडोदरा येथील परमार कुटुंबीय हा पुतळा पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्यानंतर ते घरी आलेच नसल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
1 मार्च रोजी फिरायला गेलेल्या या कुटुंबियांचा तब्बल 5 दिवसांनी तपास लागला आहे. नर्मदा सरदार सरोवर नहरमधून संपूर्ण कुटुंबियांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये कल्पेश परमार, त्यांची पत्नी तृप्ती परमार, आई उषा परमार, चार वर्षांचा मुलगा अथर्व आणि मुलगी नियती अशी मृतकांची नावे आहेत.
स्टॅच्यु ऑफ युनिटी येथे फिरायला आलेल्या या कुटुंबियांनी आपल्या नातेवाईकांना काही फोटो पाठवले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत त्यामुळे नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू झाली. परमार कुटुंबातील महिलेचा मृतदेह नर्मदा नदीच्या काठावर सापडला. कपडे आणि दागिन्यांवरून त्यांची ओळख देखील पटली. त्यानंतर इतर मृतदेहांचा तपास सुरू झाला. परमार कुटुंबियांची कार कालव्यात कशी कोसळली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
नियतीने परमार कुटुंबियांवर दुर्दैवी वेळ आणली. मुलांचा हट्ट पुरवायला गेलेल्या बापावर ही वेळ आली. या घटनेने फक्त परमार कुटुंबियच नाही तर संपूर्ण परिसर शोकाकूळ वातावरणात आहे. काही तासांपूर्वी फिरायला गेलेल्या लहान मुलांचे फोटे काढणारे कल्पेश परमार एकाएकी जगाला सोडून गेले.