कटरा : जम्मूमधील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आता दिवसाला ५० हजार भाविकांना जाता येणार आहे. कारण एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादाने तसे आदेश दिलेत आहेत. तसेच या ठिकाणी कचरा टाकणे किंवा दुर्गंधी परसविणाऱ्यांना २००० रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशाराही दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसागणित वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी  वाढ होत आहे. त्यामुळे येथील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि येथील निसर्ग सौंदर्याला कोणतीही बाधा पोहोचू नये, यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने काही निर्णय घेतलेत. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.


वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात कोणतेही बांधकाम न करण्याच्या सूचनादेखील राष्ट्रीय हरित लवादाने केल्यात. वैष्णोदेवी परिसरात कोणत्याही परिस्थितीत ५० हजारांपेक्षा जास्त लोक जाणार नाहीत, याची काळजी घ्या, असे आदेश एनजीटीने प्रशासनाला दिले आहेत.


दरम्यान, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी ५० हजारांपेक्षा अधिक भाविक आल्यास, त्यांना अर्द्धकुंवारी किंवा कटरा येथेच थांबवण्यात यावे. वैष्णोदेवीच्या दरबाराची क्षमता ५० हजार इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त भाविकांना दरबारात जाण्याची परवानगी दिल्यास ते धोकादायक ठरु शकते. म्हणूनच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मर्यादा घालण्यात आलेय, असे आदेश देताना म्हटलेय. दरम्यान, हे आदेश कधीपासून लागू होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.


वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापन समितीने २४ नोव्हेंबरपर्यंत भाविकांसाठी नवा रस्ता खुला करावा, असेही हरित लवादाने सांगितले आहे. नवा रस्ता केवळ बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आणि भाविकांसाठी असेल, असेही लवादाकडून स्पष्ट केलेय. याशिवाय कटरा आणि परिसरात अस्वच्छता करताना आढळल्यास २ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आलेय.