अहमदाबाद : बारावीत ९९.९९ टक्के  पटकावणाऱ्या मुलाला काय व्हायचं असतं... डॉक्टर, सीए किंवा तत्सम मोठ्या पदांवर काम करण्याची त्यांची इच्छा असते... परंतु, बारावीत ९९.९९ टक्के मिळवणाऱ्या एका मुलाला मात्र जैन धर्माची दीक्षा घेऊन संन्यासी बनायचंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या १७ वर्षीय मुलाचं नाव आहे वर्शील शाह... गुजरातच्या पालदीचा तो रहिवासी आहे. विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिलेल्या वर्शीलनं ९९.९९ टक्के गुण पटकावले... यानंतर मात्र त्यानं संसाराचा त्याग करून जैन संन्यासी बनण्याचा निर्णय घेतलाय. केवळ वडिलांच्या सांगण्यावरून त्यानं बारावीची परीक्षा दिली. अजून त्यानं आपलं मार्कशीटही बघितलेलं नाही. 


आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्शीलच्या आई-वडिलांनीही त्याच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. त्यांना आपल्या मुलानं घेतलेल्या या निर्णयानं त्याला आनंद मिळत असेल तर आम्हालाही त्याचा आनंदच होईल, असं त्यांनी म्हटलंय. वर्शीलचे वडील जिगर शाह आयकर विभागात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. आपलं कुटुंब धार्मिक असल्याचा त्यांना अभिमान आहे. वर्शील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्येही कुठे फिरायला जाण्याऐवजी सत्संगमध्ये वेळ व्यतीत करत होता, असं ते अभिमानानं सांगतात.  याच सत्संगांदरम्यान वर्शील अनेक जैन मुनी आणि संन्याशांच्या संपर्कात आला.  


संपूर्ण कुटुंबीय वर्शीलच्या दीक्षा समारंभासाठी तयारी करताना दिसतोय. वर्शीलचा दीक्षा समारंभ ८ जून रोजी सूरतमध्ये होणार आहे.