खासदार वरुण गांधींनी ९ वर्ष वेतन घेतलं नाही
खासदारांना मिळणाऱ्या वेतनावरून ते नेहमीच टीकेचे धनी होतात.
नवी दिल्ली : खासदारांना मिळणाऱ्या वेतनावरून ते नेहमीच टीकेचे धनी होतात. पण देशाच्या संसदेमध्ये असाही एक खासदार आहे ज्यानं गेली ९ वर्ष वेतन घेतलेलं नाही. भाजप खासदार वरुण गांधी यांनी मागची ९ वर्ष त्यांना मिळणारं वेतन गरीब आणि गरजूंना दिलं आहे. वेतनातून मिळणारा एकही पैसा ते स्वत:साठी वापरत नाहीत. श्रीमंत खासदारांनीही त्यांचं वेतन अशाचप्रकारे सोडावं अशी मागणीही वरुण गांधींनी केली आहे. खासदारांनी वेतन सोडल्यामुळे देशभरामध्ये सकारात्मक संदेश जाईल, असंही वरुण गांधींना वाटतंय.
वरुण गांधी हे सुल्तानपूरचे खासदार आहेत. संसदेमध्ये जनहिताच्या मुद्द्यांवर होत नसलेली चर्चा आणि खासदारांचं भरमसाट वेतन या मुद्द्यांवरून वरुण गांधींनी अनेकवेळा चिंता व्यक्त केली आहे. श्रीमंत खासदारांनी आता १६ व्या लोकसभेच्या उरलेल्या कालावधीचं वेतन सोडून द्यावं असं आवाहन वरुण गांधींनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना केलं होतं. याबद्दल वरुण गांधींनी सुमित्रा महाजन यांना पत्र लिहीलं होतं. देशातले १ टक्के श्रीमंत लोकांकडे ६० टक्के संपत्ती आहे. देशातल्या ८४ टक्के श्रीमंतांकडे देशाची ७० टक्के संपत्ती आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे, असं वरुण गांधी म्हणाले.
वरुण गांधी यांनी त्यांच्या वेतनाचा भाग रामजी गुप्ता नावाच्या गरजूला दिला आहे. कॅन्सरनं त्रस्त असलेल्या रामजी गुप्तांच्या उपचारांसाठी वरुण गांधींनी अडीच लाख रुपयांची मदत केली. याआधी वरुण गांधींनी सुल्तानपूरच्या एका शेतकऱ्याला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. वरुण गांधी यांनी १३ जिल्ह्यांमधल्या गरजू शेतकऱ्यांनाही मदत केली आहे. सुल्तानपूरमध्ये वरुण गांधींनी जवळपास २४ गरिबांना घरही बांधून दिलं आहे.