वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
भाजपचे सुलतानपूरचे खासदार वरुण गांधी यांची लवकरच काँग्रेसमध्ये घरवापसी होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भाजपचे सुलतानपूरचे खासदार वरुण गांधी यांची लवकरच काँग्रेसमध्ये घरवापसी होण्याची शक्यता आहे. 2015 साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय महासचिव पदावरुन हटवल्यापासून वरुण गांधी नाराज आहेत. तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड करुन डावलल्यानं वरुण गांधींच्या नाराजीत भर पडलीय.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी वरुण गांधी आणि काँग्रेस पक्षात चर्चा सुरु झाल्यात. आई मनेका गांधी यांनी 1983 साली संजय विचार मंचासाठी काँग्रेसला रामराम केल्यानंतर तीन दशकांनंतर वरुण हे गांधी कुटुंबात सहभागी झाले होते.
वरुण गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात काही बैठकाही पार पडल्या आहेत. या बैठकां दरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सर्व शक्यता लक्षात घेता मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातंय. शनिवारी वरुण गांधींसाठी डिनर आणि ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशातील सध्याचं बदलतं राजकारण आणि उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली.