`आईला नाही तर, अफझल गुरुला सलाम करणार का?’ - उपराष्ट्रपती
‘वंदे मातरम’म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. मग ते म्हणण्यास लाज का वाटावी? किंवा संकोच का करावा?
नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. मग ते म्हणण्यास लाज का वाटावी? किंवा संकोच का करावा?
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा सवाल
मात्र काही लोक ‘वंदे मातरम’ म्हणण्यास नकार देतात. अशा लोकांवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी निशाणा साधला. त्याबद्दल बोलताना ‘तुम्ही आईला नाही तर, अफझल गुरुला सलाम करणार का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्या जीवनावरील एका पुस्तक प्रकाशनाप्रसंगी बोलत होते.
अहिंसक प्रवृत्तीला हिंदू धर्मच कारणीभूत
पुढे ते म्हणाले की, हिंदू हा धर्म नव्हे तर तो जीवन जगण्याची पद्धत आहे. हिंदू धर्म ही संकुचित कल्पना नाही तर त्यात व्यापक सांस्कृतिक अर्थ आहे. हिंदू धर्म भारताची संस्कृती आणि परंपरा आहे. हा धर्म अनेक पिढ्यांपासून चालत आला आहे. यावेळी नायडू यांनी भारतीयांच्या अहिंसक प्रवृत्तीला हिंदू धर्मच कारणीभूत असल्याचे सांगितले.
वसुधैव कुटुंबकम
आजवर अनेकांनी भारतावर हल्ले केले, शासन केलं. भारताचे नुकसान केले, लूटले. मात्र, भारताच्या संस्कृतीमुळेच भारताने कोणत्याही देशावर कधीही आक्रमण केले नाही. आपली संस्कृती आपल्याला वसुधैव कुटुंबकम शिकवते. ज्याचा अर्थ जग एक कुटुंब आहे, असे नायडू म्हणाले.