नवी दिल्ली : पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी आणि एआयएडीएमके आमदार ए. अनबालागन यांच्यात स्टेजवरच जुंपल्याचं चित्र आज महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळालं. सरकार आयोजित या कार्यक्रमादरम्यान दोघांत मंचावरच बाचाबाची झाली... अनबालागन भाषण देत असताना ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गांधी जयंतीनिमित्तानं पुदुच्चेरी खुल्या जागेत शौचमुक्त असल्याची घोषणा या कार्यक्रमातून करण्यात येणार होती. परंतु, या अनपेक्षित घटनेनं उपस्थितांना मोठा धक्का बसला. अनबालागन आणि बेदी यांच्या वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


आपल्या भाषणादरम्यान अनबालागन किरण बेदी यांच्यासोबत वाद घालू लागले... पहिल्यांदा किरण बेदी यांनी त्यांच्यासमोर हात जोडले... आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. 


मिळालेल्या माहितीनुसार, अनबालागन भाषण करत असताना अनेक मुद्यांवर पुदुच्चेरी प्रशासनावर टीका करत होते. तेव्हा कथित स्वरुपात त्यांचा माईक बंद करण्यात आला. यानंतर ते किरण बेदी यांच्यावर ओरडू लागले. त्यांच्या दाव्यानुसार, बेदी यांच्या आदेशावरूनच आपला माईक बंद करण्यात आला.


यानंतर बेदी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपलं म्हणणं मांडलं. 'आमदारांचं भाषण लांबल्यानं वेळेनंतर त्यांना सांगूनदेखील ते थांबले नाहीत त्यानंतर त्यांचा माईक बंद करण्यात आला' असं बेदी यांनी ट्विटरवर म्हटलंय.