नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ तोंडावर येऊन ठेपलीय. याच पार्श्वभूमीवर 'विश्व हिंदू परिषदे'नं एक महत्त्वाची घोषणा केलीय. 'विश्व हिंदू परिषदे'नं राम मंदिर निर्माण आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केलीय. निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचं राजकारण होऊ नये, यासाठी चार महिने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा मंगळवारी विहिंपचे आंतरराष्ट्रीय सचिव सुरेंद्र जैन यांनी केलीय. ही घोषणा अलाहाबादमध्ये विहिंपद्वारे कुंभमेळ्यात आयोजित करण्यात आलेल्या धर्म संसदेनंतर करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, राम मंदिर निर्माण होईपर्यंत आराम न करण्याची प्रतिज्ञाच या धर्मसंसदेतील उपस्थितांनी घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या काळात राम मंदिर आंदोलनाचं काही राजकीय पक्ष राजकारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती विहिंप नेत्यांना वाटतेय. 


विहिंप अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी प्रतिबद्ध आहे आणि नव्या सरकारच्या स्थापनेनंतर यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असंही जैन यांनी यावेळी म्हटलंय.


अशावेळी राम मंदिर आंदोलनाचं राजकारण होऊ नये यासाठी विहिंपनं चार महिने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. या काळात राम मंदिरासाठी जनजागृती सुरूच राहील, असंही विहिंपनं सांगितलंय.


दुसरीकडे, अयोध्यातील राम मंदिराचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. २९ जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार होती. परंतु, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात न्यायमूर्ती एसए बोबडे यांच्या गैरहजेरीमुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.