...अन् 400 SUV घेऊन काँग्रेस कार्यालयात पोहोचला BJP नेता! Video पाहून आठवेल `सिंघम`
BJP Leader Heads To Congress In 400 Car Convoy: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तब्बल 300 किलोमीटरचं अंतर या 400 गाड्यांनी सायरन वाजवत पार केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
Video 400 Car Convoy Sirens Blaring: मध्य प्रदेशमधील शिवपुरीहून भोपाळपर्यंतच्या 300 किलोमीटरच्या अंतर तब्बल 400 कार्सच्या ताफ्याने (400 Car Convoy) सायरन वाजवत (Sirens Blaring) पार केल्याचं पहायला मिळालं. भारतीय जनता पार्टीमधून (BJP) पुन्हा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्यासाठी या नेत्याने केलेल्या शक्तीप्रदर्शनाचा भाग म्हणून या ताफ्याची राज्यभरामध्ये चर्चा आहे. 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसविरुद्ध बंड पुकारत या नेत्याने काँग्रेस सोडली होती. मात्र आता पुन्हा त्यांनी काँग्रेसचा 'हात' धरण्याचा निर्णय घेतला आहे.
...म्हणून भाजपा सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी
शिवपुरीच्या राजकीय वर्तुळामधील वजनदार व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या बैजनाथ सिंह यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारुन 2020 साली ज्योतिरादित्य शिंदेंबरोबर भाजपामध्ये प्रवेश केला होता. या बंडखोरीनंतर राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने पुन्हा राज्यात सरकार स्थापन केलं. या बंडखोरीचं नेतृत्व करणारे ज्योतिरादित्य शिंदे हे सध्या केंद्रात मंत्री आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैजनाथ सिंह हे 2023 च्या शेवटी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी सर्व प्रकारे प्रयत्न करुन झाले. मात्र आपल्याला भाजपाकडून तिकीट मिळणार नाही याची खात्री पटल्यानंतर बैजनाथ सिंह यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा >> 2.25 कोटींची कार 27 दिवसांत बिघडली; मालक म्हणतो, "यापेक्षा 2 लाखांची कार..."
300 किमी, 400 गाड्या अन् वरिष्ठांकडून स्वागत
राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबरोबरच दिग्विजय सिंह यांनी बैजनाथ सिंह पक्षात पुन्हा प्रवेश करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांचं स्वागत केलं आहे. बैजनाथ सिंह यांच्याबरोबर जिल्हास्तरावरील भाजपाचे 15 नेतेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पुन्हा भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याच्या हेतूने बैजनाथ सिंह यांनी शिवपुरीहून भोपाळमधील काँग्रेसच्या कार्यालयात येताना तब्बल 400 गाड्यांचा ताफा आणला होता. 300 किलोमीटरचं अंतर या 400 गाड्यांनी सायरन वाजवत पार केलं. सायरन वाजवत जाणाऱ्या या तब्बल 400 गाड्यांच्या ताफ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये या गाड्यांमधील लोक हात बाहेर काढून अभिवादन करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर टीकेची झोड
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतऱ अनेकांनी या ताफ्याची तुलना 'सिंघम' चित्रपटातील एका दृष्याशी केली आहे. अनेकांनी सायरनवर आक्षेप घेतला आहे. आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या रुग्णवाहिका, पोलिस, फायर ब्रिगेडसारख्या सेवांसाठी सायरन वापरला जातो. मात्र आता राजकीय नेते शक्ती प्रदर्शन करण्यासाठीही सायरन वापरु लागले आहेत अशी टीका हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केली जात आहे.