2.25 कोटींची कार 27 दिवसांत बिघडली; मालक म्हणतो, "यापेक्षा 2 लाखांची कार..."

2 Crore Car Breakdown On Highway: सोशल मीडियावर हा संपूर्ण प्रकार या आलिशान कारच्या मालकाने शेअर केला असून या 2 कोटींच्या कारपेक्षा 2 लाखांच्या कारवर अधिक विश्वास ठेवता येईल असा टोलाही या व्यक्तीने लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 15, 2023, 01:14 PM IST
2.25 कोटींची कार 27 दिवसांत बिघडली; मालक म्हणतो, "यापेक्षा 2 लाखांची कार..." title=
अचानक बंद पडली ही कार अन् त्यानंतर कारमधील व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावं लागलं

2 Crore Car Breakdown On Highway: भारतामधील आलीशान गाड्यांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असलेल्या नावांपैकी एक म्हणजे मर्सिडीज बेन्झ! मर्सिडीजच्या गाड्या या फारच चांगल्या क्षमतेबरोबरच दर्जानुसारही उत्तम मानल्या जातात. मात्र दिल्लीमधील एका व्यक्तीला याच्या अगदी उलट अनुभव आला आहे. 3 दिवसांपूर्वी घडलेला प्रकार हा मर्सिडीजच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीमधील एका व्यापाऱ्याने 15 मे रोजी मर्सिडीज बेन्स एस- क्लास (Mercedes-Benz S-Class) कार विकत घेतली होती. मात्र ही कार रात्री प्रवासादरम्यान अचानक थांबली अन् बंद पडली. अनेक तास कंपनीच्या हेल्पलाइनवरील दाव्यानुसार मदतीची वाट पाहत उभं राहिल्यानंतरही काही विशेष घडलं नाही. प्रकरणं इतक्यापर्यंत गेलं ही या गाडीने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. ज्या कार मालकाबरोबर हा प्रकार घडला त्याचं नाव आहे हिमांशु सिंघल.

2 कोटी 10 लाखांची कार

हिमांशु सिंघल यांनीच सोशल मीडियावरुन नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती दिली आहे. मे महिन्यामध्ये मी ही कार 2 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतली आहे, असा उल्लेख या पोस्टमध्ये हिमांशु यांनी केला आहे. या कारची एकूण किंमत 2.25 कोटींपेक्षा अधिक आहे. ही कार हिंमांशु यांच्या कंपनीच्या नावाने रजिस्टर आहे. 12 जून रोजी रात्री हिमांशु दिल्लीवरुन मेरठला जात होते. अचानक या कारमधून मोठा आवाज आला आणि ती जागेवर थांबली. गाडी रस्त्याच्या कडेला घेण्यासाठीही फारच कष्ट घ्यावे लागले. रस्त्यावर वेगाने वाहने जात असल्याने फारवेळ या कारजवळ उभं राहणंही हिंमाशु आणि त्यांच्या भावाला शक्य नव्हतं.

केवळ 600 किमी चालली

कार बंद पडल्यानंतर हिंमांशु यांनी तातडीने मर्सिडीजच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन मदतीची मागणी केली. मात्र अनेक तास वाट पाहूनही मदत आली नाही. या साऱ्या प्रकरामुळे हिंमांशु यांना इतका त्रास झाला की अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. बऱ्याच तासांनंतर मर्सिडीजने ही कार टो करुन नेली. दुसऱ्या दिवशी गाडीची तपासणी करण्यात आली मात्र नेमकी ती कशामुळे बंद पडली हे समजू शकलं नाही असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही कार विकत घेतल्यापासून केवळ 600 किलोमीटर चालली आहे असं सांगितलं जात आहे.

एवढा पैसा खर्च करुनही

या सर्व प्रकारामुळे हिंमाशु सिंघल फारच निराश झाले आहेत. 2 कोटींची कार विकत घेतल्यानंतरही तिच्यावर फारसा विश्वास दाखवता येणार नाही जितका 2 लाखांच्या कारवर दाखवता येईल असं हिमांशु यांनी म्हटलं आहे. हिमांशु हे मर्सिडीजचे जुने ग्राहक आहेत. या कंपनीच्या एकूण 5 गाड्या त्यांच्याकडे आहे. नुकत्याच घेतलेल्या आणि अचानक बंद पडलेल्या एस क्लासबरोबरच हिमांशु यांच्याकडे मर्सिडीज बेन्झन जीएलई, ई क्लाससारख्या गाड्या आहेत. मात्र एवढा पैसा खर्च करुनही ऐनवेळी गाडीने अशी फजिती केल्याने आपली फसवणूक झाल्यासारखं हिमांशु यांना वाटत आहे.

भारतीयांसाठी नियम वेगळे आहेत का?

हिमांशु सिंघल यांनी यासंदर्भात मर्सिडीज बेन्झ इंडियाला एक सविस्तर इमेल लिहिला आहे. मात्र यानंतरही कंपनीने कोणातीही रिप्लाय त्यांना मिळालेला नाही. एवढ्या महागड्या गाडीमध्ये नेमकी काय तांत्रिक अडचण आली हे कंपनीने हिमांशु यांना सांगितलेलं नाही. संतापलेल्या हिमांशु यांनी भारतीयांच्या जीवासंदर्भात या जर्मन कंपनीचे सेफ्टी सॅण्डर्ड्स वेगळे आहेत की काय असा खोचक प्रश्न हिमांशु यांनी या ईमेलमध्ये कंपनीला विचारला आहे.