VIDEO : सिद्धू मुसेवालांची हत्या करणाऱ्या आरोपींची पोलिसांशी चकमक, एका गुंडाचा खात्मा
सिद्धू मुसेवाला यांचे संशयित मारेकरी आणि पोलीस यांच्यात अटारी सीमेजवळ चकमक सुरू आहे
Sidhu Moosewala Murder Case : भारत-पाक सीमेजवळील अटारी बॉर्डरजवळ पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक सुरू आहे. मूसेवाला यांचे मारेकरी आणि पंजाब पोलिस यांच्यात ही चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये संशयित जगरूपसिंग रूपाला पोलिसांनी ठार केले आहे. या चकमकीमध्ये दोन-तीन पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.
सिद्धू मुसेवाला यांचे संशयित मारेकरी आणि पोलीस यांच्यात चकमक सुरू आहे. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांना पोलिसांनी घरातच राहण्यास सांगितले आहे. अमृतसर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चिचा भकना गावात ही चकमक सुरू आहे. हे गुंड एका जुन्या घरामध्ये लपले आहेत. तिघांपैकी एकाला पोलिसांनी ठार केले आहे. चिचा भकना गावापासून पाकिस्तानची सीमा केवळ १०० मीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत हे गुंड पाकिस्तानात घुसण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत पोलिसांनी दोन किमी परिसराला पूर्णपणे वेढा घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिसांच्या मदतीसाठी सध्या भारत-पाक सीमेवरून पोलिसांची अनेक वाहने पोहोचली आहेत. जगरूपसिंग रूपा आणि मन्नू कुसा हे दोन गुंड एका निर्जन भागात बांधलेल्या जुन्या वाड्यात लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या दोन तासांपासून ही चकमक सुरू आहे. त्यामुळे या गुंडांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याचे म्हटले जात आहे.
नेमकं काय घडलं?
गुंड जगरूप सिंग उर्फ रूपा याच्याबद्दल माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. गोळ्यांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. जगरूप सिंग रूपा आणि मन्नू कुसा हे दोघे शार्प शूटर आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपा चकमकीत ठार झाला आहे. तर मनू एके-४७ रायफलने सतत गोळीबार करत आहे. या चकमकीत तीन पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिद्धू मुसेवालांच्या हत्येनंतर पोलिसांनी कारवाई करत अनेक गुंडांना अटक केली. केवळ हे दोन गुंड फरार झाले होते. त्यापैकी बुधवारी पोलिसांनी एका गुंडाचा खात्मा केला. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्यांच्या गावाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.