Supreme Court : सर्वोच्च न्यायलयात मंगळवारी एका सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एका वकिलामध्ये मजेदार संवाद पाहायला मिळाला. सुनावणीदरम्यान या वकिलाने आधी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची माफी मागितली. त्यानंतर वकिलाने मी व्हिस्कीचा चाहता आहे अशी कबुली नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे दिली. यानंतर न्यायलयात एकच हास्यकल्लोळ उठला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि ज्येष्ठ वकिलातील या संवादाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. न्यायालयातील या हलक्याफुलक्या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयात औद्योगिक अल्कोहोलचे नियमन करण्यासाठी कायदे करण्याच्या राज्यांच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणावर सुनावणी सुरू होती. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील दिनेश द्विवेदी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर युक्तिवाद करत होते. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. वकील दिनेश द्विवेदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यात झालेल्या संवादामुळे कोर्टात उपस्थित सर्वजण हसत सुटले.


त्याचं झालं असं की या सुनावणी सुरु असताना वकील दिनेश द्विवेदी यांनी त्यांच्या रंगलेल्या केसांबद्दल खंडपीठाची स्वतःहून माफी मागितली. द्विवेदी यांनी होळीचा उल्लेख करत मला रंगलेल्या केसांसाठी माफ करा अशी विनंती खंडपीठाला केली. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गंमतीने याचा (केसांचा) दारूशी काही संबंध तर नाही ना, असा सवाल केला. मात्र त्यानंतर उत्तर देताना द्विवेदी यांनी त्यांच्या व्हिस्की प्रती असलेल्या प्रेमाची कबुलीच कोर्टात दिली. त्यामुळे सर्वांनाच हसू आवरेनासं झालं.


केसांसाठी मागितली माफी


"माझ्या रंगलेल्या केसांबद्दल मी माफी मागतो. हे होळीमुळे घडलं. तुमच्या आजूबाजूला बरीच मुलं आणि नातवंडे असतील तेव्हा असंच होतं," असं द्विवेदी यांनी सांगितलं. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हसून, "याचा दारूशी काही संबंध नाही ना?" असं विचारलं. सरन्यायाधीशांनी असं म्हणताच कोर्टात उपस्थित लोक हसू लागले. यावर द्विवेदी यांनी हसत उत्तर दिले. मी व्हिस्कीचा चाहता आहे, असे द्विवेदी यांनी म्हटलं आहे.



मी व्हिस्कीचा चाहता आहे


द्विवेदी नंतर हसण्यात सामील झाले आणि त्यांनी कबूल केले की, "हाहा, त्याचाही संबंध आहे. होळीमध्ये मद्यपान असं आमच्याकडे समीकरण आहे आणि मला ते मान्य करावे लागेल... मी व्हिस्कीचा चाहता आहे."


त्यानंतर "नऊ न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करणे, तेही पेपरलेस कोर्टात, माझ्यासाठी हे आव्हान आहे, असे द्विवेदी म्हणाले. यावर, "अरे नाही, यामुळे काम आणखी सोपे होते. तुम्ही सहज एका पानावरून दुसऱ्या पानावर जाऊ शकता, असे सरन्यायाधिशांनी म्हटलं. यावर प्रत्युत्तरात तुमच्या वयानुसार ठीक आहे, असे द्विवेदी यांनी म्हटलं.


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुनावणीदरम्यान द्विवेदी यांनी नंतर व्हिस्कीच्या आवडीबद्दल अधिक स्पष्टपणे सांगितले. "मला सिंगल माल्ट व्हिस्की आवडते. मी एडिनबर्गला गेलो होतो, जो सिंगल-माल्ट व्हिस्कीचा मक्का आहे. मला काही बर्फाचे तुकडे घालायचे होते पण वेटर नाराज झाला आणि म्हणाला की तुम्हाला ते पाण्याशिवाय प्यावे लागेल, तुम्ही त्या काही मिसळू शकत नाही. त्यासाठी वेगळा ग्लास आहे. मला पहिल्यांदाच याची माहिती मिळाली," असेही द्विवेदी म्हणाले.


दरम्यान, हा व्हिडीओ नुकताच पोस्ट करण्यात आला असून त्या दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. तर या व्हिडीओला जवळपास 400 लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोकांना विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्याने मला हा एक विचित्र कबुलीजबाब वाटतो असे म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने, हे पाहून खूप आनंद झाला, असं म्हटलं आहे.