हैदराबाद : हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावर दोन दारुड्यांनी कथित रुपात गैरवर्तन केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर या दोन्ही नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ही महिला कर्मचारी दोन्ही दारुड्यांचा सामना करत असल्याचं दिसत आहे. विमानतळावरुन या दारुड्यांना पीडित महिला पोलीस चौकीकडे घेऊन जात असल्याचं दिसत आहे.


पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओत महिला कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरुन दोन्ही आरोपी व्यक्ती तिची माफी मागताना दिसत आहेत. तसेच तिच्या पायाही पडत आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली.


राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पोलीस उपनिरीक्षक रमेश नाईक यांनी सांगितलं की, पीडित महिलेने आरोपींविरोधात तक्रार दाखल केलेली नाहीये. आरोपी हे विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे आणि ते दारुच्या नशेत होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच मित्र आपल्या काही मित्रांना विमानतळावर सोडण्यासाठी आले होते. या दरम्यान एअरलाइन्सची महिला कर्मचारी तेथे दाखल झाली. त्यावेळी आरोपींनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं.