Satyendra Jain : जेल आहे की मसाज पार्लर? तिहारमध्ये आपच्या मंत्र्यांला मिळतेय VIP ट्रिटमेंट
Satyendra Jain : दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते तिहारमध्ये मसाज करताना दिसत आहेत.
Satyendra Jain Viral Video : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांचा आम आदमी पार्टी (AAP) हा विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भाजपकडून (BJP) आपच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. अशातच तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (massage video) होत आहे. व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन बॉडी मसाज घेताना दिसत आहेत. आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या मसाज व्हिडिओवरून आप आणि भाजप यांच्यात वाक् युद्ध सुरु झालयं.
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडिओ ट्विट करून आपला प्रश्न विचारलेत. यापूर्वी ईडीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले होते की, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात नियमांकडे दुर्लक्ष करून अनेक सुविधा दिल्या जात आहेत. ईडीने काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. पूनावाला यांनी वेगवेगळे व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत. एका व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन यांच्याजवळ अनेक लोक बसलेले दिसत आहेत. सत्येंद्र जैन यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने यापूर्वीही अनेकदा केली होती. मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप आणखी आक्रमक झाली आहे.
मंत्री सत्येंद्र जैन बेडवर झोपलेले असताना त्यांच्या पायाला मसाज करताना एक व्यक्ती स्पष्टपणे दिसत आहे. तर जैन काही पेपर वाचताना दिसत आहेत. तिहार तुरुंगातील व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. जैन यांना तुरुंगात देण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी वागणुकीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.
आपने दिलं स्पष्टीकरण
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. "भाजपने सत्येंद्र जैन यांच्या आजारपणाची खिल्ली उडवली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होत आहे, त्यामुळेच या मुद्द्यांवरुन लक्ष वळण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. भाजपने सत्येंद्र जैन यांना गेल्या 6 महिन्यांपासून तुरुंगात डांबून ठेवले आहे. आता त्यांच्या उपचाराचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करुन खिल्ली उडवली जात आहे. भाजपशिवाय अन्य कोणताही पक्ष हे करणार नाही. पंतप्रधानांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वजण आजारी पडू शकतात. कारागृहात पडून सत्येंद्र जैन यांना दुखापत झाली होते. त्यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याला नियमित फिजिओथेरपीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे," असे मनीष सिसोदिया म्हणाले.