Karachi Mosque Attack: भारताचा शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे सध्या आर्थित गर्तेत अडकला आहे. पाकिस्तानमध्ये सध्या मोठं आर्थिक संकट (Pakistan Economic Crisis) उभं राहिलं असून लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खाण्याच्या वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या असून, अनुदानात मिळणाऱ्या गोष्टींसाठी लोक लांबच्या लांब रांगा लावत आहेत. एकीकडे इतकी गंभीर स्थिता असताना दुसरीकडे काही लोकांनी एक मशिदीवर चढून हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराचीमध्ये दिवसाढवळ्या हल्ला करत एका अहमदिया मशिदीची नासधूस करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 2 जानेवारीचा असल्याचा दावा केला जात आहे. 


कादियानी मशिदीवर कट्टरवाद्यांचा हल्ला


स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीमधील हाशू मार्केट येथे कादियानी मशिदीवर कट्टरवाद्यांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये कट्टरवादी मशिदीवर चढून तोडफोड करत असल्याचं दिसत आहे. मशिदीची नासधूस करणारे तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचे (TLP) सदस्य असल्याचा दावा आहे. हे प्रार्थनास्थळ अहमदिया समुदायाचं असल्यानेच त्यावर हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे. 



कट्टरवाद्यांनी मिनार तोडले


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कट्टरवाद्यांनी अहमदी समाजाच्या मशिदीवर हल्ला केला. पोलीस त्यांना रोखू शकले नाहीत. काही लोकांनी आपलं तोंड लपवलं होतं. तर काही मात्र जाहीरपणे तोडफोड करत होते. त्यांना आपली ओळख उघड होत असल्याचीही भीती नव्हती. 


कट्टरवादी शिडीच्या सहाय्याने मशिदीच्या छतावर पोहोचले आणि मिनार तोडू लागले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. हल्ला करणाऱ्यांचा शोध सध्या सुरु आहे. 


अहमदी मशिदीवर एका महिन्यात दुसरा हल्ला


मिळालेल्या माहितीनुसार, कादियानी मशिदीवर हा एका महिन्यात झालेला दुसरा हल्ला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघाती हल्ला झाल्याने आधीच खळबळ माजली आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की, मशिदीचं छतच खाली कोसळलं. यावेळी मशिदीमध्ये लोक प्रार्थना करत होते.