पाकिस्तानी गायिकेनं म्हणलं `जन-गण-मन`
पाकिस्तान आज स्वतंत्रता दिवस साजरा करतोय तर भारत उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला आपला स्वतंत्रता दिवस साजरा करेल.
मुंबई : पाकिस्तान आज स्वतंत्रता दिवस साजरा करतोय तर भारत उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला आपला स्वतंत्रता दिवस साजरा करेल. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही सीमेवर गोळीबारी सुरूच आहे. पण याचवेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन्ही देशांच्या गायकांनी देशांची राष्ट्रगीतं गायलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्रेंड होतं आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गायकांनी जन-गण-मन गायलं आहे तर भारतीय गायकांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत गायलं आहे.
जेव्हा आपण कलेसाठी देशाच्या सीमा उघडतो तेव्हा शांतता येते, असं संदेश देत या गाण्याच्या व्हिडिओला सुरुवात होते. फेसबूक ग्रुप 'व्हॉईस ऑफ राम'नं हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये भारताच्या सिद्धार्थ बसरुर, इशिता चक्रवर्ती, संजीता भट्टाचार्य, निखिल डिसूजा, अरुण हरिदास कामत, मेहर मिस्त्री, आदिल मॅन्युअल, राघव आणि अर्जुन यांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत गायलं आहे. तर पाकिस्तानच्या अलिशिया जियास, नताशा बेग, जे अली आणि जिशान अलीनं जन-गण-मन गायलं आहे. आत्तापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.