शाहीन बागेत शुभा मुद्गल यांच्या शास्त्रीय संगीताची मैफल; व्हीडिओ व्हायरल
अवघ्या २० सेकंदांच्या या व्हीडिओला फेसबुकवर एक लाखापेक्षा अधिक शेअर्स मिळाले आहेत.
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारण कायद्याविरोधातील (CAA) आंदोलनाचे केंद्र झालेल्या शाहीन बागेत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या गाण्याची मैफल रंगल्याची माहिती समोर आली आहे. शाहीन बागेतील आंदोलनाच्याठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर शुभा मुद्गल गातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अवघ्या २० सेकंदांच्या या व्हीडिओला फेसबुकवर एक लाखापेक्षा अधिक शेअर्स मिळाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, शुभा मुद्गल मंगळवारी शाहीन बागेत आल्या होत्या. यानंतर उपस्थितांना शास्त्रीय सुरांची जादू अनुभवायला मिळाली. शास्त्रीय संगीत आणि पॉप संगीत अशा दोन्ही क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या शुभा मुद्गल यांचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर त्यांची क्लीप वेगाने व्हायरल होत आहे.
तत्पूर्वी मुंबईतही काही स्टॅण्डअप कॉमेडियन्सनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक कार्यक्रम केला होता. दरम्यान, आगामी काळात शाहीन बागेतील आंदोलनाला आणखी काही कलाकार उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, भाजप सरकारने मात्र शाहीन बागेतील आंदोलनापाठी कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. सीएएविरोधात सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहे. ही आंदोलने योगायोग नाही, तो एक प्रयोग आहे. या माध्यमातून देशाच्या सौहार्दाला बाधा आणण्याचा डाव साधला जात आहे. ही आंदोलने केवळ एका कायद्याच्याविरोधात असती तर सरकारने आश्वस्त केल्यानंतर ती थांबायला पाहिजे होती. मात्र, आप आणि काँग्रेस हे पक्ष लोकांना सातत्याने चिथावणी देत आहेत. राज्यघटना आणि तिरंगा समोर ठेवून लोकांपासून मूळ कट लपवला जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.