लखनऊ : उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू न्यायव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह समोर उभा करून गेलाय. याच प्रकरणातील एक व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडिओत पीडितेचे वडील गंभीर जखमी अवस्थेत दिसत आहेत. हा व्हिडिओ ३ एप्रिल रोजीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ एका रुग्णालयातील आहे. यात पीडितेच्या वडिलांसोबत दोन पोलीसही दिसत आहे. या व्हिडिओत पीडितेच्या वडिलांच्या अंगभर दिसणाऱ्या जखमा त्यांना किती क्रूर मारहाण करण्यात आली, याची जणू साक्षच देत आहेत. व्हिडिओत त्यांच्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर, पाठीवर अतिशय क्रूररितीन मारहाण करण्यात आल्याच्या खूणा दिसत आहेत. या जखमांतून रक्त वाहतंय आणि बाजुला उभे असलेले पोलीस मात्र हसताना दिसत आहेत. या जखमा इतक्या भयंकर आहेत, की हा व्हिडिओ आम्ही स्पष्टपणे दाखवू शकत नाहीत. 


अंगावर काटा उभा करणारा व्हिडिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन पोलिसांनी त्याला इथं आणलंय आणि हे एक भांडणाचं प्रकरण आहे, असं म्हणताना एक डॉक्टर या व्हिडिओत दिसत आहे. 


तर, आपल्याला आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरचा भाऊ अतुल सिंह यानं मारहाण केल्याचं पीडितेचे वडील म्हणत असतानाही या व्हिडिओत दिसतंय. पोलीस फक्त पाहत राहिले आणि अतुल सिंह आणि त्याचा भाऊ मला बदडत राहिले... असं त्यांनी म्हटलंय. 


व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 


 


पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. पोलिसांनी त्यांना एका भांडणाचा आरोपी म्हणून पकडून आणलं होतं. ९ एप्रिल रोजी पीडितेच्या वडिलांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता. या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस धाडलीय. 


उल्लेखनीय म्हणजे, पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर चीफ मेडिकल ऑफिसर (सीएमओ) एस पी चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेच्या वडिलांना हॉस्पीटलमध्ये आणण्यात आलं तेव्हा त्यांना अंतर्गत भागात गंभीर जखमा झाल्या होत्या.... त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.