Video : वर्गात घुसला अ्न विद्यार्थ्यांवर रोखली बंदुक; पोलीस अधिकाऱ्याने शिताफीने केली आरोपीला अटक
West Bengal Crime : पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात एक बंदुकधारी व्यक्ती घुसली होती. पोलिसांना बोलवाल तर गोळ्या घालेन अशी धमकीही या माथेफिरुने दिली होती.
Crime News : पश्चिम बंगालमधील (West Bengal) मालदा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालदामध्ये एका माथेफिरुने हातात रिव्हॉल्वर घेऊन शाळेतल्या एका वर्गात प्रवेश केला होता. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मुचिया आंचल चंद्र मोहन हायस्कूलच्या वर्गात हा बंदूकधारी घुसला होता. या व्यक्तीने वर्गात विद्यार्थ्यांना ओलीस (Hostage) ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी (West Bengal Police) मुलांची सुटका करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. या सर्व प्रकारामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती. या व्यक्तीने पॅन्टमध्ये चाकूही ठेवला होता. पोलिसांनी मोठ्या धाडसाने मुलांची सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आपल्या जीवाची पर्वा न करता एका पोलीस अधिकाऱ्याने या माथेफिरुचा प्लॅन उधळून लावला. पोलीस अधिकारी तिथे माध्यम प्रतिनिधी म्हणून गेला होता. पोलीस अधिकाऱ्याच्या शूरतेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दुपारच्या सत्रात शाळा सुरु असताना सातवीच्या वर्गात देव बल्लब नावाच्या व्यक्तीने प्रवेश केला होता. या वर्गात जवळपास 71 विद्यार्थी होते. वर्गात शिरलेल्या देव बल्लब च्या एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात कागद होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, त्याच्याकडे अॅसिडच्या भरलेल्या बाटल्याही होत्या. त्याने विद्यार्थ्यांकडे बंदूक रोखत आरडाओरडा सुरू केला. देव बल्लबने मुलांना आणि शिक्षकाला जीवे मारण्याची धमकीही दिली.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधीक्षक प्रदीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने तात्काळ शाळेत धाव घेतली. मात्र देव बल्लबने जर इथे कोणी पोलीस कर्मचारी दिसला तर गोळ्या मारेन अशी धमकीच देऊन टाकली. त्याचवेळी पोलीस उपअधीक्षक अझरुद्दीन खान यांनी आपला गणवेश काढला आणि तिथे असलेल्या व्यक्तीचे टीशर्ट आणि चप्पल घातली आणि माध्यम प्रतिनिधी म्हणून वर्गात शिरले. यावेळी बल्लवला प्रश्न विचारण्याच्या बहाण्याने अझरुद्दीन खान वर्गात घुसताच त्यांनी धावत जाऊन बल्लबवर उडी मारली. त्यानंतर बाकीच्यांनी बल्लबला मागून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
...तर स्वतःला माफ करु शकलो नसतो
"शाळेत कोणीतरी घुसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्याच्याकडे शस्त्रे असल्याचेही आम्हाला सांगण्यात आले होते. आम्ही त्याच्याशी बोललो आणि कोणतीही जीवितहानी न होऊ देता त्याला अटक केली. पत्नीशी काही कौटुंबिक वादातून आरोपीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पुढील तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप कुमार यांनी सांगितले. तर "वर्गातल्या मुलांना सुरक्षितपणे वाचवणे हे माझे पहिले आणि एकमेव उद्दिष्ट होते. आज कोणत्या आईने आपले मूल गमावले असते तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो," असे पोलीस उपअधीक्षक अझरुद्दीन खान यांनी म्हटले.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली होती. आरोपीला तात्काळ अटक केल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांचे कौतुक केले. मात्र हा संपूर्ण कटाचा भाग असू शकतो असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मालदा शाळेत बंदूक घेऊन घुसणे हा काही वेडेपणाचा प्रकार असू शकत नाही, असे मुख्यमंत्री सचिवालायने सांगितले आहे.