नवी दिल्ली: ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका फेटाळल्यानंतर मद्यसम्राट विजय मल्ल्या याने स्टेट बँकेवर आगपाखड केली आहे. स्टेट बँक ही भारतीय करदात्यांचा अमाप पैसा कायदेशीर खटल्यांवर उधळत असल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. विजय मल्ल्याने यासंदर्भात ट्विट करून म्हटले आहे की, स्टेट बँकेचे ब्रिटनमधील वकील माझ्याविरोधातील यशस्वी कामगिरीचे प्रेझेंटेशन करण्यात व्यग्र आहेत. यासाठी भारतीय करदात्यांचा पैसा वापरला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच माझ्या कर्जाची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, तरीही स्टेट बँकेकडून वकिलांवरील दौलतजादा सुरु असल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, मल्ल्याने आपल्या ट्विटसोबत काही कागदपत्रे जोडली आहेत. स्टेट बँकेचे ब्रिटनमधील वकील माझ्याविरोधातील खटल्याच्या आधारे स्वत:ची प्रसिद्धी करत असल्याचे हे पुरावे आहेत. यासाठी भारतीय करदात्यांचा पैसा वापरला जात असून स्टेट बँकेने त्याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, असेही मल्ल्याने म्हटले आहे. स्टेट बँकेने ब्रिटनमधील माझ्या मालमत्ता निम्म्या दरात विकल्या. आता उर्वरित मालमत्ता विकल्या तरीही स्टेट बँकेला कायदेशीर देणी फेडता येणार नाही. मग हा सगळा घाट नेमका कशासाठी घातला होता? ब्रिटनमधील वकिलांना श्रीमंत करण्यासाठी का? स्टेट बँकेने याचे उत्तर द्यावे, अशी मागणी मल्ल्याने केली आहे. 





मी माझ्या कर्जाची १०० टक्के रक्कम फेडण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला होता. मात्र, प्रसारमाध्यमांना केवळ सनसनाटी बातम्या हव्या असतात. पण कोणीही माझ्याकडून पैसे वसूल करण्यासाठी स्टेट बँकेने कायदेशीर खर्चापोटी किती रक्कम खर्च केली, याबद्दल माहिती अधिकाराचा वापर करून कोणीच माहिती का काढत नाही, असा सवालही यावेळी विजय मल्ल्याने विचारला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि स्टेट बँक यासंदर्भात काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.