विजय मल्ल्याला मोठा झटका; यूकेतील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश
तेविन येथील लेडीवॉक आणि ब्रॅम्बल लाँज आणि मल्ल्याचे सध्या वास्तव्य असलेल्या वेल्विन या मालमत्ता त्यामुळे कचाट्यात सापडल्या आहेत.
नवी दिल्ली: भारतीय बँकांचे तब्बल ९००० कोटी रूपये घेऊन फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला गुरुवारी लंडनमधील उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मल्ल्याने कर्ज घेतलेल्या १३ बँकांच्या समूहाला कर्जवसुलीसाठी लंडन आणि युकेमधील मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली आहे. या आदेशामुळे अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना मल्ल्याच्या मालमत्तांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाली आहे. तेविन येथील लेडीवॉक आणि ब्रॅम्बल लाँज आणि मल्ल्याचे सध्या वास्तव्य असलेल्या वेल्विन या मालमत्ता त्यामुळे कचाट्यात सापडल्या आहेत. भारतीय बँकांना या आदेशाचा कर्जवसुलीसाठी वापर करून घेता येऊ शकतो.
पीटीआयच्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाय आणि कोणत्याही अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी मल्ल्याच्या लेडीवॉक, क्वीन हू लेन, तेविन आणि वेल्विन, ब्रँम्बल लाँज याठिकाणी प्रवेश करुन तेथील मल्ल्याच्या मालकीच्या वस्तू जप्त करू शकतात. त्यामुळे मल्ल्याच्या अडचणी वाढल्या आहेत.